हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांच्या विमान अपघात आणि एनसीपी एकत्र यावर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी अजितदादा यांच्या विमान अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले होते की लोकांच्या मनातील शंका दूर झाल्या पाहिजेत. जे आक्षेप घेतले गेले आहेत, त्यांची सखोल चौकशी राज्य शासन करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
अजितदादांच्या अपघातामुळे जसे रोहित पवारांना दुःख झाले आहे, त्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला झाले आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
हे देखील वाचा :
पुढे हसन मुश्रीफ म्हणाले की, “आमच्याही मनामध्ये अपघाताबाबत काही शंका आहेत. त्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. रोहित पवारांनी आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये कृपया हस्तक्षेप करू नये. अजितदादांच्या अपघाताबद्दल त्यांचा पुतण्या म्हणून रोहित पवारांची अस्वस्थता मी समजू शकतो,”असे देखील ते म्हणाले आहेत.
अजित पवारांनंतर राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, “प्रफुल्ल पटेल हे पवार साहेबांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत आणि आजही ते कार्याध्यक्ष आहेत. सुनेत्रा वहिनी यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतरही प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष म्हणून राहणार आहेत. सुनील तटकरे हे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकार त्यांना आहे. मग या दोघांनाच का लक्ष्य केले जाते? त्यांना खलनायक का ठरवले जाते? त्यामुळे विनाकारण त्यांना लक्ष्य करू नका. आमच्या पक्षामध्ये कोणीही लुडबूड करू नये,” असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा :
पुढे ते म्हणाले की,” विलीनीकरणाबाबत अजितदादा एकटेच चर्चा करत होते. आमच्यापैकी कोणीही त्या ठिकाणी नव्हते. विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही, असा आमचा दावा नाही. पण अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती बदललेली आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाला विश्वासात घ्यावे लागेल. त्यांचे मत काय आहे, ते पाहावे लागेल. तसेच सुनेत्रा वहिनी आणि कुटुंबीयांचे मत काय आहे, याबाबत पक्षामध्ये चर्चा होईल. विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये मी नव्हतो. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार पवार साहेबांनी थांबायचे आणि अजितदादांनी नेतृत्व करायचे, असे सांगितले जात आहे. शशिकांत शिंदे बोलत असतं. मात्र ती चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीबाबत असायची. या विलीनीकरणाबाबत अजितदादा आमच्याशी काही बोलले नव्हते, हे खरे आहे,” अशी भूमिका हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे.
“कोल्हापूरच्या विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्याचे ठरले आहे. त्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांनी अजितदादांकडे त्यावेळी दिला होता. एमआयडीसीची जमीन मैदानासाठी देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला होता. अजितदादा यांनी मांडलेल्या चार ते पाच मुद्द्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यामध्ये कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानास मंजुरी देण्यात आली आहे. या मैदानाला स्वर्गीय अजितदादा यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे. याबद्दल जिल्हा नियोजन मंडळाचे मी आभार मानतो. आता या नावामध्ये बदल होणार नाही. इतर कोणी मागणी केली असेल, तर त्यांचे नाव इतर प्रकल्पांना देऊ शकतो. अजून भरपूर कामे आहेत. सुनेत्रा वहिनी पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मनोधैर्य देण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असे देखील हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.






