फोटो सौजन्य- सोशल मीडिया
जम्मू काश्मीरमध्ये 1 ऑक्टोबरला निवडणूकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र हरियाणा विधानसभेचे मतदान बाकी असल्याने जम्मू काश्मीरचा एक्झिट पोल हा आजच्या दिवशी जाहीर करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील 90 जागांसाठी तीन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी 63.45 टक्के मतदान झाले आहे. केंद्रशासित प्रदेशात 2014 नंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळू शकतात काही एक्झिट पोलनुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस सत्तास्थापन करु शकते असे दिसत आहे. तर भाजपलाही चांगल्या जागा मिळत आहे.
एक्झिट पोल
दैनिक भास्कर पोल- नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी- 35 ते 40, भाजप- 20 ते 25, पीडीपी- 4 ते 7, अपक्ष 12 ते 16 जागा
सी-व्होटर पोल- नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी- 30 ते 48, भाजप- 27 ते 32, पीडीपी- 6 ते 12, अपक्ष 6 ते 11 जागा
गुलिस्तान एक्झिट पोल- नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी- 31 ते 36, भाजप- 28 ते 30, पीडीपी- 5 ते 7 अपक्ष 19 ते 23 जागा
पीपल्स पल्स पोल – नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी- 46 ते 50, भाजप- 23 ते 27, पीडीपी- 6 ते 10, अपक्ष 7 ते 11 जागा
या एक्झिट पोलनुसार निदर्शनास येत आहे की नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी ही सत्तास्थापनेच्या जवळ आहे मात्र अपक्षांची भूमिका सत्तास्थापनेमध्ये महत्वाची ठरु शकणार आहे.
ओमर अब्दुल्ला यांची एक्झिट पोलसंबंधी सोशल मीडियावर पोस्ट
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्झिट पोल फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, ते 8 ऑक्टोबरची वाट पाहतील, जेव्हा निवडणूकीचे निकाल जाहीर होतील. “मला आश्चर्य वाटते की चॅनेल एक्झिट पोलचा त्रास देत आहेत, विशेषत: अलीकडील सार्वत्रिक निवडणुकांच्या फसवणुकीनंतर. मी चॅनेल्स, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप इ.वरील सर्व गोंगाटांकडे दुर्लक्ष करत आहे कारण 8 ऑक्टोबरला फक्त महत्त्वाचे क्रमांक समोर येतील. बाकी फक्त टाईमपास आहे,” त्याने सोशल मीडिया साइट X वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे.
I’m amazed channels are bothering with exit polls especially after the fiasco of the recent general elections. I’m ignoring all the noise on channels, social media, WhatsApp Etc because the only numbers that matter will be revealed on the 8th of Oct. The rest is just time pass.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 5, 2024
कलम 370 रद्द केल्यानंतर पहिलीच निवडणूक
2019 मध्ये केंद्र शासनाने कलम 370 रद्द केले आणि जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केले. त्यामुळे 2014 नंतर म्हणजेच 10 वर्षानंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी निवडणूकीकरिता जोरदार प्रचार केला.