संग्रहित फोटो
नवी मुंबई : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आज मतदान होत आहे. आज महाराष्ट्रात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर वावंजा पंचायत समितीसाठी वावंजा गावात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, विशेषतः महिलांचा प्रतिसाद सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे.
ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून, प्रमुख राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी वावंजा गावात तळ ठोकत कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आहे. तर शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील हेही सकाळपासून गावात फिरून मतदारांशी संवाद साधत आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडूनही जोरदार हालचाली सुरू आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आतापर्यंत मतदान शांततेत सुरू असून, मतदार शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, दुपारनंतर मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा : मावळचा थरार: भाजपचा ३० वर्षांचा गड अभेद्य राहणार की राष्ट्रवादी मुसंडी मारणार?
पुणे जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीही आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली. थंडगार हवामान असूनही सकाळपासून नागरिकांनी मतदान केंद्रांकडे धाव घेतली. विशेषतः ग्रामीण भागात सकाळच्या सत्रातच मतदानाचा उत्साह स्पष्ट दिसून आला. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पहिल्यांदाच मतदान करणारे तरुण मोठ्या संख्येने केंद्रांवर उपस्थित होते. अनेक ठिकाणी महिलांनी घरगुती कामे उरकून लवकर मतदान करण्याला प्राधान्य दिले. काही मतदान केंद्रांवर पहिल्या दोन तासांतच समाधानकारक टक्केवारी नोंदवली गेली. मतदारांनी ‘लोकशाहीचा उत्सव’ म्हणत शांततेत मतदान केल्याचे चित्र दिसले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली होती. मतदान केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ, मतपेट्या, ओळख तपासणीची व्यवस्था तसेच दिव्यांग व ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांगा आणि सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. काही केंद्रांवर उन्हापासून संरक्षणासाठी शेडचीही व्यवस्था करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नव्हती.






