कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ८ उमेदवारानी अर्ज दाखल केले होते.सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवस होता.यावेळी 2 अपक्षांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.यामध्ये प्रकाश दत्ताराम नारकर व विश्वनाथ बाबू कदम (पियाळी) यांचा समावेश आहे,अशी माहिती कणकवली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.
दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती.त्यामुदतीपर्यंत आठ उमेदवारांपैकी 2 अपक्षांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात 6 उमेदवार एकमेकासमोर मैदानात उभे राहिले आहेत. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ठाकसे शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर व महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्यातच खरी लढत होणार आहे.
कणकवली विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी येथील तहसील कार्यालयात सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नामनिर्देशन पत्र माघारीची प्रक्रिया झाली. दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास अपक्ष उमेदवार प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यावेळी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गटाचे)कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर उपस्थित होते.
आता कणकवली विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या रिंगणात महायुतीच्यावतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नितेश नारायण राणे, महाविकास आघाडीच्यावतीने ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संदेश भास्कर पारकर,अपक्ष संदेश सुदाम परकर, बंदेनवाज हुसेन खानी, गणेश अरविंद माने व बहुजन समाज पक्षाचे उमेदवार चंद्रकांत जाधव राहिले आहेत.
उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेच्यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे,देवगड तहसीलदार लक्ष्मण कसेकर,वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील उपस्थित होते.उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.
नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर थेट लढत
कणकवली मतदारसंघात 6 उमेदवार उभे असले तरीही या मतदारसंघात थेट लढत ही भाजपचे उमेदवार आणि कणकवलीचे विद्यमान आमदार नितेश राणे विरुद्ध शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यात होणार आहे. मागील दोन्ही निवडणुकीमध्ये नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातून विजय मिळवला आहे. 2014 मधून कॉंग्रेसकडून तर 2019 मधून भाजपकडून राणे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी नितेश राणे यांना हॅट्ट्रिकची संधी आहे.मात्र त्यांच्यासमोर असणार आव्हानही कडवे आहे. शिवसेना ठाकरे गट सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे कणकवली शहराचे माजी नगराध्यक्ष होते. त्यांना मतदारसंघात चांगला जनाधार आहे. त्यामुळे तळकोकणात या मतदारसंघात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहेच शिवाय या लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.