Washim Farmer Loan Waiver:
Wardha News : जिल्ह्यात पावसातील तूट, जमिनीतील कमी झालेला ओलावा, विहिरी आणि बोरवेलच्या पाणीपातळीत झालेली घट तसेच सिंचनाकरिता प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता, रब्बी हंगामातील पीक नियोजन करताना शेतकऱ्यांनी उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या पाळ्यांचा अचूक अंदाज घेऊनच पेरणी व पेरणी क्षेत्र निश्चित करावे. मुख्यतः कमी पाण्यात येणाऱ्या व जास्त नफा देणाऱ्या पिकांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पादन मिळावे, यासाठी कृषी विभागामार्फत पीक नियोजन, सिंचन व्यवस्थापन, सुधारित पीक पद्धती आणि शासकीय योजनांच्या लाभाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. उपलब्ध सिंचन पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, पाणी उपलब्ध होणाऱ्या गावातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत सिंचन नियोजनाची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील काळ्या व मध्यम जमिनीसाठी हरभरा, करडई, मोहरी, जवस, मसूर आणि रब्बी ज्वारी ही पिके जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा व सिंचनाची सोय लक्षात घेऊन निवडावीत, करडई हे खोल मुळामुळे तुलनेने दुष्काळ सहिष्णू पीक असून, हरभरा पिकात जमिनीतील उर्वरित ओलाव्याचा प्रभावी वापर करता येतो. मोहरी, जवस व मसूर ही पिकेही कमी पाण्याच्या परिस्थितीत योग्य ठरू शकतात.
सूर्यफूल पिकासाठी तुलनेने अधिक सिंचनाची आवश्यकता असल्याने त्याची निवड पाण्याच्या उपलब्धतेनुसार करावी. पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू नये यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. आवश्यकतेनुसार कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार पिकांच्या अवस्थेला अनुरूप उपाययोजना कराव्यात. पोटॅशियम नायट्रेट किंवा अॅटी-ट्रान्सपिरंटसारख्या निविष्ठांचा वापर संबंधित पिकासाठी शिफारस, योग्य मात्रा व कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा.
निम्न वर्षा, बौर व पौथरा सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्धतेनुसार पाणीपाळ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. पाटबंधारे विभाग व प्रकल्प सल्लागार समितीच्या निर्णयानुसार सिंचनाचे वेळापत्रक निश्चित होणार असून, साधारणपणे पेरणी व पिकांच्या प्राथमिक वाढीसाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिस-या आठवड्यात पहिली पाणीपाळी आणि पिकांच्या गरजेनुसार डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दुसरी पाणीपाळी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन प्रस्तावित आहे.
रब्बी हंगामात ज्वारी व मसूर पिकाव्या मिनीकिट योजनेंतर्गत उपलब्धतेनुसार ज्वारीची १,००० आणि मसूरची ७०० मिनीकिटे वितरित करण्याचे नियोजन आहे, प्रति शेतकरी एक मिनीकिट या प्रमाणात ज्वारीचे ४ किलो व मसूरचे ८ किलो बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या व निवड झालेल्या शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.






