मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट
शेगाव- मनसगाव वरवट संग्रामपूर –जळगाव जामोद हा महत्त्वाचा मुख्य रस्ता रात्री ३ वाजतापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. तसेच कालखेड येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक सखल भाग जलमय झाले असून प्रशासनाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन महसूल, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे. पूरग्रस्त भागातील २०० ते ३०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.
प्रशासनाने जिल्ह्यातील पूरग्रस्त भागावर सतत लक्ष ठेवले असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत, अन्नधान्य, निवारा आणि इतर जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
बाजार समितीच्या पर्जन्यमापन केंद्रात १४६ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली असून गत ७० वर्षांतील सर्व विक्रम मोडीत निघाल्याचा दावा करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले, नदी-नाल्यांना पूर आला आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
शेगाव शहरातील फुलेनगर परिसरात घराची भिंत कोसळून सरस्वतीबाई गोटीराम पल्हाडे (८६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ९.२० वाजता त्यांच्या राहत्या घरी घडली. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
खामगाव तालुक्यातील सुटाळा येथे पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेल्याची घटना घडली. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस, तूर व व इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य आणि व्यापाऱ्यांच्या दुकानांतील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कवरही परिणाम झाला आहे.






