मराठी चित्रपट, नाट्यक्षेत्राला समृद्ध करणार : सुधीर मुनगंटीवार

दादासाहेब फाळके या मराठी माणसाने चित्रपट भारतीयांसमोर आणला. पहिला चित्रपट देखील मराठी, राजा हरिश्चंद्र; त्यामुळे या क्षेत्रात मराठीचं मोठं स्थान आहे.

  • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त कलावंतांचा केला सन्मान

मुंबई : प्रत्येकाचा “हॅपिनेस इंडेक्स” (Happiness Index) वाढविण्याची क्षमता असलेल्या महाराष्ट्रातील कलावंतांची, रंगभूमी व चित्रपट सृष्टीची भरभराट करण्यासाठी आणि या माध्यमातून चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी आज दिले.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व सह कलाकारांचा सुधीर मुनगंटीवार यांनी आज सन्मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते, कवि किशोर कदम, अक्षय बर्दापूरकर, दिग्दर्शक शंतनू रोडे आदी दिग्गज कलावंत यावेळी उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या यादीत “मराठी” ने गौरवाचे स्थान मिळविले. या गुणी मराठी कलावंतांचा आज सन्मान करताना अभिमानाने उर भरून येत आहे. जगात भारत हा सर्वात सुंदर देश आहेच ; सोबतच आमचा जन्म ज्या महाराष्ट्रात झाला ती मायभूमी गुणवान आणि कर्तृत्ववान आहे.

दादासाहेब फाळके या मराठी माणसाने चित्रपट भारतीयांसमोर आणला. पहिला चित्रपट देखील मराठी, राजा हरिश्चंद्र; त्यामुळे या क्षेत्रात मराठीचं मोठं स्थान आहे. श्यामची आई, सोंगाड्या, पिंजरा या चित्रपटांची परंपरा आणि वैविध्यता अतुलनीय आहे. ही परंपरा आपण कायम ठेवू, नाट्य मंदिरे उत्तम करुन रंगभूमी निश्चित संपन्न करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अभिनेते किशोर कदम, शंतनू रोडे यांनीदेखील मनोगत व्यक्त करुन सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचे अभिनंदन केले व हा सोहळा आयोजित केल्याबद्दल आभार मानले. आरोह वेलणकर यांनी संचालन केले.