(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील रियालिटी शो बिग बॉस मराठीचं सहावं पर्व सध्या स्पर्धकांमधील वाद आणि भांडणांमुळे चर्चेत आहे. या घरात रोज नवनवीन वाद पाहायला मिळत आहे. बिग बॉसचे हे सहावे पर्व सुरू होऊन जवळपास चार आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, हा आठवडा सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. त्याचे कारण म्हणजे या घरातील काही सदस्यांचे आक्रमक स्वभाव, पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेल्या रूचिता जामदारचा पुन्हा तोच राग एकदा पाहायला मिळाला आहे. रूचिताचं आधी राकेश बापटसोबत कडाक्याचं भांडण झालं,त्यानंतर तिच्या आणि दिपाली सय्यदच्या भांडणाने बिग बॉसच्या घराचं वातावरण तापलं.
रूचिताच्या या वर्तणुकीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.तर दुसरीकडे दिव्याने धमकी दिल्यामुळे बिग बॉसने तिला बाहेरचा रस्ता दाखवला. एकूणच या आठवड्यात खूपच गोंधळ पाहायला मिळाला, त्यामुळे सर्वांच लक्ष भाऊच्या धक्क्याकडे लागलं होतं. आता अखेर कलर्स मराठीने भाऊच्या धक्क्याचा पहिला प्रोमो शेअर केला आहे.
यावेळी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख रूचिताची शाळा घेताना दिसत आहे. “रुचिता या घराचा सगळ्यात मोठा व्हिलन तुम्ही ठरला आहात, सतत उद्धट वागायचं, टास्क रद्द कसा होईल तेच बघायचं. एकही दिवस असा सोडला नाही जिथे तुम्ही लिमिट क्रॉस केली नाही,” असं रितेश देशमुख म्हणाला. त्यानंतर ‘ही कुऱ्हाड घ्या’ म्हणत रुचिताच्या हातात कुऱ्हाड देण्यात आली.
दरम्यान हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एकाने म्हटलं, ”दिव्याच्या ऐवजी रूचिताला काढायला पाहिजे होतं..” रुचिता आरडाओरड न करता खेळली, तर चांगली खेळू शकते, रुचिताला बाहेर काढा, रुचिता सतत भांडत असते,अशा अनेक कमेंट्स या प्रोमोवर येत आहेत.






