सनई चौघडेच्या सेटवर उन्हाळ्यात कलाकार घेत आहेत काळजी
अभिनेत्री चिन्मयी साळवी म्हणजेच शर्वरी हिने सेटवरचे वातावरण आणि ती स्वतः घेत असलेली काळजी याबद्दल खूप छान माहिती दिली आहे. चिन्मयी म्हणते “सध्या ‘सनई चौघडे‘च्या सेटवर आम्ही उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी खूप जागरूक आहोत, कारण शूट कधी कधी आऊटडोअर असतं, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
प्रॉडक्शनच घेते काळजी
सगळ्यात आधी आमचं प्रॉडक्शन खरंच खूप काळजी घेतं. सेटवर कुलर्स, एसी आणि फॅन्सची व्यवस्थित सोय असते, ज्यामुळे वातावरण सुसह्य ठेवण्याचा प्रयत्न असतो. आम्ही स्वतःही नियमितपणे सनस्क्रीन वापरतो आणि हायड्रेशनवर (पाणी पिण्यावर) खूप लक्ष देतो. आम्ही जास्तीत जास्त पाणी पितो. आमचे स्पॉट दादा – ओंकार दादा आणि सतीश दादा – दर तासाला पाण्याची आठवण करून देतात आणि बाटल्या आणून देतात, जेणेकरून आम्ही पाणी प्यायला विसरणार नाही. सेटवर सतत लिंबू सरबत, टॅंग, ऑरेंज ज्यूस अशी रिफ्रेशिंग ड्रिंक्स फिरत असतात. उन्हाळ्यात चहापेक्षा हीच पेय जास्त आवडतात. एक खूप गोड गोष्ट म्हणजे, आमच्या मेघना ताईंनी पहिल्याच दिवशी आम्हा सगळ्यांना ‘सिपर्स’ भेट दिले होते. त्यामुळे प्रत्येकाकडे स्वतःचा सिपर आहे असं चिन्मयीने सांगितलं.
जेवणातही घेतली जाते काळजी
आमच्या रोजच्या आहारात दही आणि ताक असतंच, सेटवरच्या जेवणातही ते दिल जात. त्याचबरोबर काकडी, सॅलड, कलिंगड आणि इतर फळं आम्ही घरून सोबत आणतो. अशा थंड आणि हलक्या पदार्थांमुळे शरीर हायड्रेटेड आणि फ्रेश राहायला मदत होते. थोडक्यात सांगायचं तर, या छोट्या-छोट्या सवयींमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही सेटवर उन्हाळ्याचा सामना अगदी आरामात करत आहोत.”
अशा प्रकारे, कडक उन्हातही कामाचा उत्साह कमी होऊ न देता चिन्मयी आणि संपूर्ण टीम स्वतःची काळजी घेत आहे. योग्य आहार, भरपूर पाणी आणि एकमेकांची साथ यामुळे ‘सनई चौघडे’च्या सेटवर उन्हाळ्याचा त्रास कमी आणि कामाची मजाच जास्त दिसतेय.
Sanai Chaughade : ‘सनई चौघडे’ मालिकेची धमाकेदार सुरुवात… चिन्मय मांडलेकरची दमदार एंट्री!






