नाती जपायला सांगणारी ‘चिमुकल्यांची मोठी शिकवण’

नाळ भाग 2 संपूर्णपणे खांद्यावर पेललाय तो सिनेमातल्या बालकलाकरांनी. श्रिनिवासने पोकळेने साकारलेला चैत्या पहिल्या चित्रपटाप्रमाणे इथंही आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप सोडतो.चैत्याच्या बहिणीची म्हणजे चिमीची भुमिका साकारणारी त्रिशा ठोसर सुरुवातीपासूनच तिच्या निरागस चेहऱ्याने आणि गोड अभिनयाने प्रेक्षकाचं मन जिंकून घेते.

    जगात निस्वार्थ असं काहीच नसतं, आपल्या आयुष्यात असणारी माणसं कोणत्या ना कोणत्या कारणानं, स्वार्थ घेऊन आपल्या आयुष्यात आलेली असतात. असं वाक्य सध्याच्या काळात बोललं जातं. या वाक्याला सपशेलपणे खोडून काढणारं, नातं मग ते रक्ताचं असो की नसो, त्याची विण एकदा जुळली की ते कसं घट्ट होत जातं ही मोठी शिकवण देणाऱ्या छोट्या माणसाचं जग म्हणजे नाळ 2 चित्रपट.

    नाळ चित्रपटाच्या पहिल्या भागात जन्मदात्या आईला भेटण्यासाठी धडपड करण्याचा चैत्याची ही धडपड दुसऱ्या भागातही दाखवली आहे. पण यावेळी तो त्याच्या लहान बहिणीसाठी धडपड करतो. आई मुलांच नात जेवढं निर्मळ असतं तेवढंच निर्मळ भाऊ-बहिणीचंही नातं असतं. हीच गोष्ट दुसऱ्या भागात अतिशय उत्तमरित्या सांगण्यात आली आहे.

    चित्रपट सुरु होतो तो चैत्याच्या मामाच्या गावातुन. विदर्भात राहणारा चैत्या आईबाबांसह पश्चिम महाराष्ट्रातील त्याच्या मामाच्या गावाला जातो. त्या गावात त्याची खरी आई सुद्धा असते. चैत्याला त्याच्या आईबद्दल कायम एक अप्रूप असतं. आईला भेटायला गेल्यावर त्याला कळतं की आपल्याला चिमी आणि मणी नावाचे बहिण भाऊ आहेत. रक्षाबंधणाला आपल्या चिमुकल्या बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी, तिची माया, तिचं प्रेम मिळावं म्हणून पुर्णवेळ धडपडणारा चैत्या आपल्याला दिसतो. चैत्याला छोट्या चिमीचे लाड करायचे असतात. तिच्याशी खेळायचं असतं, बोलायचं असतं. पण ती चिमीचे चैत्यामध्ये तसे बंध जुळत नाही. चिमी त्याला भाऊ मानायला तयार नसते. अखेर चिमीचं आणि त्याचं नातं कसं जुळतं हे चित्रपटात दाखवलं आहे. याबरोबरच स्वार्थापोटी आपल्याला भांवडांना दूर लोटणाऱ्या माणसांना या लहान मुलांनी त्यांच्या निरागस स्वभावातून दोन शहाणपणाच्या गोष्टीही या कथेतून सांगितल्या आहेत.

    आधी सांगितल्याप्रमाणे चित्रपटाची कथा बहिण भावाच्या नात्याभोवती फिरते. त्याच चित्रपटाच्या कथेला कुठही धक्का न लागू देता, कुठलाही फाफटपसारा न मांडता पटकथेची सुरेख मांडणी केली आहे. काही ठिकाणी उगाच चित्रपटाची लांबी वाढवली असं वाटत असलं तरी त्यामुळे एकंदरीत चित्रपटाची कथा, निर्सगाचं सुखावणारं चित्रण, चैत्याची चाललेली धडपड, कमी वयात तिन्ही मुलांमधला संमजसपणा पाहता चित्रपट काहीतरी प्रेक्षकांना सिनेमागृहाबाहेर जाताना फार मोलाची शिकवण देऊन जातो, यात काही दुमत नाही.

    महत्त्वाचं म्हणजे नाळ 2 भाग संपूर्णपणे खांद्यावर पेललाय तो चित्रपटातल्या बालकलाकरांनी. श्रिनिवासने पोकळेनं साकारलेला चैत्या पहिल्या चित्रपटाप्रमाणे इथंही आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप सोडतो. चैत्याच्या बहिणीची म्हणजे चिमीची भुमिका साकारणारी त्रिशा ठोसर सुरुवातीपासूनच तिच्या निरागस चेहऱ्यानं आणि गोड अभिनयानं प्रेक्षकाचं मन जिंकून घेते. तिचं बोलणं, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिचं रुसणं, भावासाठीची काळजी, अशा अनेक भावना त्रिशाने खूप सुंदर साकारल्या आहेत. चैत्या परत गावी जाण्यासाठी निघतो तेव्हा त्याच्यासाठी तिच्या डोळ्यात दिसणरं प्रेम पाहता प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. चिमीचा ज्याच्यावर जिव असतो तो तिचा दिव्यांग भाऊ मणी म्हणजे भार्गव जगताप. खऱ्या आयुष्यातही दिव्यांग असलेल्या भार्गवने सिनेमात कमाल काम केलंय. या तिन्ही मुलांकडून सुंदर काम करवून घेणाऱ्या दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंक्कटीचं कौतुक करावं तितकं कमी. याशिवाय प्रत्येकाला त्याच्या आजोळच्या विश्वात नेणारं दृश्य फुलवणारं ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं कमाल संगीत.

    चित्रपटाची धुरा चिमुकल्यांच्या जरी हातात असली तरी चित्रपटातील इतर कलाकरांनीही उत्तम काम केलंय. नागराज मंजुळे आणि देविका दफ्तरदार यांचा अभिनय उत्तम झाला आहे. चैत्याची खरी आई दीप्ती देवीने मोजक्याच सिनमधून स्वतःची वेगळी छाप पाडली आहे. चैत्याचे खरे वडील म्हणजेच जितेंद्र जोशीने काम चोख केलं आहे. तरीही वडिल म्हणून त्याची भूमिका हवा तसा प्रभाव पाडू शकत नाही.

    चित्रपटाचे संवालेखन नागराज मंजुळे यांनी केलं आहे अन् ते साधे पण तितकंच मनाला भिडणारे. चिमुकल्यांच्या जगातल्या गमतीजमती, त्यांची निरागसता त्यांनी त्यांच्या बोलक्या चेहऱ्यांनी सहजपणे मांडली आहे. अगदी साधी कथा असली तरी कुठेही रटाळ वाटू न देता अत्यंत रंजक पद्धतीने सीन्स आपल्यासमोर रंगवण्यात आले आहेत. चित्रपटातील कथेप्रमाणे जमेची बाजू ठरलीये ती चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. सुधाकर स्वतः त्या क्षेत्रातले तज्ञ असल्याने यातील प्रत्येक फ्रेमवर घेतलेली मेहनत पडद्यावर दिसून येत आहे. सातारा, जुन्नर परिसरातील निसर्गरम्य परिसरात झालेलं चित्रीकरण, छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींना कॅमरातून कैद करत काही वेळेसाठी आपल्याला त्यांच्याच जगात गेल्याची जाणीव करुन देतात इतके भन्नाट शॅाट्स झाले आहेत. विहिरीजवळ चैत्या, चिमी आणि मणी बसलेले असतात, त्यावेळी त्यांच्या मनातली इच्छा ते बोलून ते विहिरीत फुले टाकतात. विहिरीत पडत जाणारी एक एक फुलाचं सुंदर चित्रण पाहताना तुम्ही स्तब्ध होता. यासोबतच, डोगंर, रस्ते, धबधब्याचं चित्रण तर लाजवाबचं आहेत. एकूणच आजच्या या धकाधकीच्या जीवनात एक शांत, संयत आणि सोपी पण तितकीच हृदयस्पर्शी कथानक असलेला चित्रपट पाहायचा असल्यास ‘नाळ २’ तुम्ही नक्की पाहू शकता. असणारं नातं बहरण्यास मदत करणारं आणि उसवलेल्या नात्यांची वीण घट्ट करणारं चिमुकल्यांचं हे निरागस विश्व बघायला हवं.

    चित्रपटाचा दर्जा – ****

    चित्रपटाचे दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी यंक्कटी

    संगीत : ए. व्ही. प्रफुल्लचंद्र

    चित्रपटाचे कलाकार – श्रिनिवासन पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी, देविका दफ्तरदार दीप्ती देवी