महाराष्ट्राच्या कुशीतील गोव्याचे सारेच अजब गजब आहे. इथले निवंत “सुशेगात” राहणारे बिनधास्त लोक आणि त्याहूनही भन्नाट असे परदेशी देशी प्रवासी, स्वस्त मद्या बरोबर चविष्ट माशांच्या जेवणाची मेजवानी आणि अत्यंत सुंदर मोहमयी असे समुद्र किनारे… गोव्याचे हे रूप आपल्या मनात ठसलेले असते.
गोव्याला शोभेशा अशा, “प्रेमाच्या दिवशी : व्लेंटाईन्स डे” अवघ्या चाळीस आमदारांच्या या प्रदेशात आजचे मतदान मात्र मोठ्या अटी-तटीचे होते आहे. सर्व मिळून जेमतेम साडे अकरा लाखांपेक्षाही कमी मतदार इथे आहेत.
यंदाच्या निवडणुकीत पूर्ण बहुमत स्वबळावर हवे, हा भाजपाचा प्रयत्न असून, “बावीसांत बावीस प्लस” म्हणजे २०२२२ च्या निवडणुकीत २२ पेक्षा अधिक आमदार अशी घोषणा देत भाजपा प्रचारात उतरला आहे. भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षांच्या सत्तेला आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस या दोन मोठ्या व आपापल्या राज्यात कार्यक्षमतेने सत्ता टिकवणाऱ्या पक्षांनी भाजपाला थेट आव्हान दिले आहे.
परिणामी सर्व चाळीस मतदारसंघात पाच ते दहा उमेदवार रिंगणात आहेत. तेरा उमेदवारही एखाद्या ठिकाणी दिसत आहेत.
गेल्या तीन महिन्यात ममता बॅनर्जींनी गोव्यात दोनदा दौरे केले. त्यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्या आय-पॅक संस्थेचे लोक इथे तळ ठोकून होते. पण प्रत्यक्ष प्रचारात ममता आल्याच नाहीत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांनी त्या मानाने स्वतः प्रचारही केला. शिवसेनेने या वेळी अधिक ताकद लावली. उद्धव नाही, पण भावी सेना पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे हे मंत्र्यांची, खासदारांची फौज घेऊन शेवटच्या दोन दिवसात आले.
शिवसेना पणजीत भाजपाचा पराभव करण्यावर जोर देते आहे, पण तिथे ते दिवंगत भाजपा नेते मनोहर पर्रिकरांचे बंडखोर चिरंजीव उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देत आहेत. उत्पल पर्रिकरांची उमेदवारी हा गोव्यातील एक चर्चेचा मोठा विषय बनला होता. मनोहर पर्रिकरांनी गोव्यातील भाजपाला स्थिरता दिली, जनाधराही मिळवून दिला आणि जेव्हा राजकीय जोड-तोड करून सत्ता घ्यायची होती, तेव्हाही पर्रिकरांच्या राजकीय संबंधांमुळे मागील २०१७ च्या निवडणुकीत केवळ १३ जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाला गोव्याची सत्ता राखता आली. पर्रिकरांचे योगदान भाजपासाठी मोठेच आहे.
२०१७ च्या निवडणुकी नंतर सरकार स्थापनेचे जे नाट्य पणजीत रंगले त्यात नितीन गडकरी हेच भाजपाच्या सत्ता स्थापनेचे सारे सूत्र संचालन करत होते. यंदाच्या २०२२ च्या निवडणुकीतही महाराष्ट्राचा मोठा संदर्भ भाजपसाठी आहे. आपले माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस हे भाजपचे निवडणूक प्रभारी आहेत. ते गेले तीन महिने जवळपास पणजीतच तळ ठोकून होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांसोबत ते निवडणुकीचे सूत्रसंचालत करत आहेत. गोव्याच्या आजच्या मतदानाने फडणवीसांच्याही नेतृत्वाचा कस एकापरीने लागणार आहे !
गोव्यात मागील निवडणुकीत सत्तेच्या जवळ जाण्याचा पराक्रम काँग्रेसने केला होता. देशात सर्वत्र मार खाणाऱ्या राहुल गांधी व सोनिया गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसने गोव्यात भाजपा पेक्षा अधिक आमदार निवडून आणले होते. पण पाच वर्षांनंतर २०२२ च्या निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेसकडे फक्त तीन आमदार शिल्लक होते. आता गोवा फॉर्वर्ड पक्षासह सर्व चाळीस जागी काँग्रेस लढत आहे. या सर्व उमेदवारांना काँग्रेसने संविधानाची शपथ दिली. निकालानंतर आपण पक्षांतर करणार नाही, फुटणार नाही, हे उमेदावारांना सांगावे लागले. तशा प्रतिज्ञापत्रांवर सर्व उमेदवारांनी सह्याही केल्या.
काँग्रेसची ही शपथेची व शपथपत्राची संकल्पना केजरीवालांनाही आवडली. त्यांच्याही उमेदवारांना केजरीवालंनी एकनिष्ठ राहण्याच्या आणा-भाका दिल्या असून आता यंदाच्या निवडणुकीने ही नवी प्रथा गोव्यात सुरु झालेली आहे. याचे मुख्य कारण होते ते हेच की मावळत्या सभागृहातील जवळपास साठ टक्के आमदारांनी त्या पाच वर्षात एक वा दोन वेळा पक्षांतरे घडवून आणली आहेत ! पण निवडून आल्यानंतर आमदार हे पक्षाला जुमानण्यास अजिबातच बांधील राहात नाहीत ही गोव्याच्या राजकारणातली वास्तविकता आहे.
प्रचार संपला तेव्हा काँग्रेसला त्याचे प्रत्यंतरही आले. एका हिंदी वृत्तवाहिनीने काँग्रेसचे संभाव्य आमदार कसे पैसे घेऊन फुटण्याच्या तयाऱ्या करत आहेत याचे स्टिंग ऑपरेशन केले. त्याचा आधार घेऊन काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. तोच कित्ता तृणमूल काँग्रेसनेही गिरवला व तेही तक्रारी करायला धावले ! या छोट्या राज्यातील या मोठ्या गंमती जमती प्रत्यक्षात कशा उतरतात यासाठी आपल्याला १० मार्चच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.