(फोटो सौजन्य: istock)
सध्याच्या या बदलत्या युगात अनेक आजारांचे प्रमाण वेगाने वाढू लागले आहे. जसजसा काळ बदलत आहे तसतसे आजारांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. आता कॅन्सरकडेच पाहा… पूर्वी क्वचितच कुणालाही तरी होणारा हा आजार आता सर्वसामान्यांनाही सर्रास होऊ लागला आहे. कॅन्सरचा आजार काही साधासुधा नव्हे यामुळे आपल्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यावर उपचार उपलब्ध असले तरी हा आजार वाढल्यास यावर उपचारही कोणता परिणाम दाखवत नाहीत आणि नकळत आपण मृत्यूला बळी पडतो.
अनेक सेलिब्रिटींनाही या आजारने हैराण केले आहे. गेल्या काळात तुम्ही याबाबत अनेक बातम्या ऐकल्या असाव्यात. टीव्ही अभिनेत्री हिना खानदेखील ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहेत. अशात कॅन्सरबाबत जागरूकता वाढवणे आणि कर्करोगाच्या उपचारांना प्रोत्साहन देणे फार गरजेचे बनले आहे. हा आजार अनेक स्टेजेसमध्ये येतो ज्यात शेवटचा स्टेज सर्वात धोकादायक मानला जातो यातून बाहेर पडणे खूप कठीण असते. अनेकांना कॅन्सर हा आजार आपल्याला आहे हे समजतच नाही बहुदा याच्या संकेतांकडे ते दुर्लक्ष करतात ज्यामुळे याच्या स्टेजेस वाढू लागतात आणि शेवटच्या स्टेजमध्ये आपण थेट मृत्यूस बळी पडतो.
पण आता चिंता करू नका, कारण आज आम्ही तुम्हाला कॅन्सरच्या काही सध्या लक्षणांविषयी माहिती सांगत आहोत ज्यांच्यावर वेळीच उपचार करून तुम्ही कॅन्सरचा धोका टाळू शकता. आपले शरीर आपल्याला याबाबतचे काही संकेत देत असतो. हे नक्की कोणते संकेत आहेत ते आज आपण या लेखातून सविस्तर जाणून घेणार आहोत.
अचानक वजन कमी होणे
अचानक वजन कमी होणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते. जर तुमचे वजन अचानक झपाट्याने कमी होत असेल आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. हे असे होणे कर्करोगाचे लक्षण असू शकते. पचनसंस्थेशी संबंधित कर्करोग जसे की जठर, स्वादुपिंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग असल्यास अचानक वजन कमी होण्याची लक्षणे दिसून येतात. जर तुमचेही असे अचानक वजन कमी होत असले तर वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शरीरात गाठी किंवा त्वचेचा घट्टसर भाग निर्माण होणे
शरीरात कोणत्याही ठिकाणी गाठ निर्माण होणे अथवा त्वचेचा घट्टसर भाग जाणवत असेल तर हे कॅन्सरचे लक्षण असू शकते. विशेषतः स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या बाबतीत अशा गाठी आढळून येतात. या सुरुवातील वेदना देत नाहीत ज्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते मात्र हळूहळू त्या भागात जळजळ किंवा वेदना निर्माण होऊ लागते. असे कोणतेही बदल शरीरात जाणवत असल्यास वेळीच हॉस्पिटल गाठा आणि यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
असामान्य रक्तस्त्राव होणे
शरीराच्या कोणत्याही अवयवातून अनपेक्षित रक्तस्त्राव होत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. लघवीमध्ये रक्तस्त्राव होणे हे मूत्राशयाच्या कर्करोगाचे संकेत असू शकते. तर, स्तनातून रक्तस्त्राव होणे किंवा रक्त दिसणे हे स्तनाच्या कर्करोगाचे संभाव्य लक्षण आहे. मासिक पाळीव्यतिरिक्त गर्भाशयातून रक्तस्राव होणे, हे देखील गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळे शरीरातील या बदलांची वेळीच दखल घ्या आणि योग्य ते उपचार करा.