नवी दिल्ली – हा व्हिडिओ १८ सप्टेंबर २०२२ चा आहे, जेव्हा कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात १० हजारांहून अधिक खलिस्तान समर्थक एकत्र आले होते. खलिस्तान हा भारतापासून वेगळा देश बनवण्याच्या प्रश्नावर ‘सार्वमत’ घेण्यासाठी ‘सिख फॉर जस्टिस’ च्या कार्यक्रमात हे लोक जमले होते. भारत सरकारच्या तीव्र विरोधानंतरही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अमेरिकेची शीख फॉर जस्टिस म्हणजेच SFJ संघटना जगातील अनेक देशांमध्ये खलिस्तानच्या समर्थनार्थ सार्वमत घेत आहे. याच क्रमाने १८ सप्टेंबर रोजी कॅनडामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंडिपेंडंटच्या रिपोर्टनुसार सुमारे १० ते १२ हजार लोकांनी यात भाग घेतला होता.
लोकांची मते जाणून घेतांना तिथे उपस्थित लोकांना विचारण्यात आले होते- ‘तुम्हाला भारत सोडून नवा खलिस्तान देश हवा आहे का?’ भारतीय दूतावासाने कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे तक्रार करून ‘सार्वमत’ आयोजित करण्यास विरोध केला. तथापि, मत स्वातंत्र्याचा हवाला देत कॅनडाने कार्यक्रमावर बंदी घालण्यास नकार दिला.
या घटनेनंतर लगेचच, भारत सरकारने कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांना सतर्क राहण्याचा इशारा जारी केला. त्याच वेळी, २२ सप्टेंबर रोजी भारत सरकारचे परराष्ट्र प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हे सार्वमत हास्यास्पद म्हटले आहे. देश तोडण्याचा कट्टरतावादी गटांचा हा डाव असल्याचे ते म्हणाले.