नवी दिल्ली- देशाच्या नव्या संसद बिल्डिंगचं (New Parliament Building) उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. आता या बिल्डिंगच्या उद्घाटनावरुन राजकारण सुरु झालं आहे. या बिल्डिंगचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांच्या हस्ते का करण्यात येत नाहीये, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विचारलाय. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येते आहे. कर्नाटकच्या विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या 19 विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत एक ट्विट केलंय. त्यात नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवं, पंतप्रधानांनी नाही. असं लिहित त्यांनी केंद्र सरकारसमोर नवं आव्हान उभं केलंय. काँग्रेसकडून नंतर या मुद्द्यावर भाजपावर टीका करण्यात येते आहे. पंतप्रधानांनी संसद भवनाचं उद्घाटन करणं हे घटनात्मक नसल्याचा आक्षेप काँग्रेसनं घेतलाय. ज्यावेळी नवी संसद बांधण्याचं भूमिपूजन करण्यात आलं, त्याही वेळी राष्ट्रपतींना जाणीवपूर्क दूर ठेवण्यात आलं होतं. आता उद्घानावेळीही राष्ट्रपतींना दूर ठेवणे योग्य नाही, असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे. पंतप्रधानांनी या संसद भवनाच्या उद्घाटनसाठी राष्ट्रपतींना आग्रहपूर्वक निमंत्रण देण्याची गरज असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.
या उद्घाटन समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. त्यानंतर आता सर्वच राजकीय विरोधी पक्ष काँग्रेसच्या बाजूनं उतरल्याचं दिसतंय. आम आदमी पार्टी, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा, तृणमूल काँग्रेस, राषअट्रीय जनता दल यासह अनेक पक्ष या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहेत.
28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावकर यांची जंयती आहे. त्याच दिवशी नव्या संसद भवनाचं उद्घाटन कशासाठी असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन किंवा गांधी जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम का ठेवण्यात आला नाही असा प्रश्न विचारला जातोय.
काँग्रेस नको त्या विषयावर वाद निर्माण करत असल्याची भाजपानं प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात तर पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात. सरकार संसदेत नेतृत्व करीत असते. राष्ट्रपती कोणत्याही सदनाचे सदस्य नसतात तर ते पंतप्रधान असतात. राजकीय पोळ्या शेकण्यासाठी असे आरोप करण्यात येत असल्याचं भाजपाचं म्हणणं आहे.