फोटो सौजन्य - Social Media
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि मायगव्ह (MyGov) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत देशपातळीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. देशातील ‘सुपर 100’ विजेत्यांमध्ये सर्वाधिक 19 विद्यार्थी महाराष्ट्राचे असून, यामध्ये 14 मुली आणि 5 मुलांचा समावेश आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत 2021 पासून सुरू झालेला ‘वीर गाथा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या पराक्रमाची ओळख करून देण्यासाठी राबवला जात आहे. यंदाची ‘वीर गाथा 5.0’ ही त्याची पाचवी आवृत्ती असून, यामध्ये देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत भारतातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच परदेशातील 18 देशांमधील 91 सीबीएसई (CBSE) शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, त्यामधून चार परदेशस्थ विद्यार्थ्यांनीही राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे. संपूर्ण देशातून तब्बल 1.92 कोटी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती, हे या उपक्रमाचे वाढते महत्त्व अधोरेखित करते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चित्रकला, कविता, परिच्छेद लेखन आणि मल्टिमीडिया सादरीकरण या विविध प्रकारांत आपली सर्जनशीलता आणि देशभक्तीपूर्ण विचार प्रभावीपणे मांडले.
प्राथमिक गटात (इयत्ता 3री ते 5वी) सानवी भिंगारडे (कविता), वर्धन फलके (चित्रकला), जान्हवी खोत (परिच्छेद लेखन), वेदिका कविताके (परिच्छेद लेखन), विधी वानखेडे (चित्रकला) आणि मंजुश्री घोरपडे (परिच्छेद लेखन) यांनी राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले. माध्यमिक गटात (इयत्ता 6वी ते 8वी) अर्पित जाधव आणि सावी मुद्रळे यांनी मल्टिमीडिया सादरीकरणात, तर श्रावणी संकपाळ (कविता), शिवांक खोडे आणि शौर्य लेकुळे (चित्रकला), तसेच श्रेया उंबरकर, आदित्य गायकवाड आणि शमिका गवंडी यांनी परिच्छेद लेखनात बाजी मारली. उच्च माध्यमिक गटात (इयत्ता 9वी ते 10वी) अवनी खोरी (चित्रकला) आणि समीक्षा मोझर (परिच्छेद लेखन), तर इयत्ता 11वी ते 12वी गटात दीक्षा येलमार आणि सिद्धी रामुगडे (परिच्छेद लेखन) यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.
या 100 राष्ट्रीय विजेत्यांना नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयातर्फे प्रत्येकी 10,000 रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, 26 जानेवारी 2026 रोजी कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य प्रजासत्ताक दिन संचलनाचे ‘विशेष अतिथी’ म्हणून उपस्थित राहण्याचा मानही या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.






