पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 30 भाविक जखमी!

आज सकाळी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या सिंहद्वार येथे मोठ्या संख्येने भाविक थांबले होते आणि त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला तेव्हा मोठी गर्दी झाली होती.

    पुरी : ओडिशातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरात (Shri Jagannath Mandir) शुक्रवारी मंगल आरतीदरम्यान चेंगराचेंगरीसारखी झाली. या घटनेत किमान ३० भाविक जखमी झाले आहेत, ज्यात बहुतांश वृद्ध महिलांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या सिंहद्वार येथे मोठ्या संख्येने भाविक थांबले होते आणि त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला तेव्हा मोठी गर्दी झाली होती.

    मंदिराच्या आतील ‘कुर्मबेध’ नावाच्या ठिकाणी सात पहाच (सात पायऱ्यांचा दरवाजा) आणि घंटा दरवाजातून भाविक आत जात असताना प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अनेकांनी यात्रेकरूंच्या गर्दीचे चुकीचे व्यवस्थापन हे या घटनेचे कारण असल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षक विशाल सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, गर्दीतील काही भाविक जखमी झाले आणि काहींनी उलट्या आणि गुदमरल्याच्या तक्रारी केल्या. बहुतांश भाविकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मंदिरात भाविकांच्या व्यवस्थेसाठी  15 पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.