जंगलात गोळीबाराचा थरार; पोलिसांच्या चकमकीत ४ महिला नक्षलवाद्यांचा खात्मा
मध्य प्रदेशच्या बालाघाटात जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जंगलात चकमक झडली. या चकमकीत 4 महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक गढी पोलीस ठाणे क्षेत्रातील रौंदा जंगलात झाली. या जंगलात नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. पोलिसांनी चकमकीत हत्यारे आणि साहित्य जप्त केलं आहे.
पोलीस आणि हॉक फोर्स जवानांनी रौंदा येथील जंगलात शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत चार महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीदरम्यान एक इंसास रायफल, एक एसएलआर रायफल आणि एक ३०३ रायफल व्यतिरिक्त अनेक साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
जंगलातील चकमकीदरम्यान काही नक्षलवादी जखमी झाले. या घनदाट जंगलाचा फायदा उचलून काही नक्षलवाद्यांनी पळ काढला. जखमी नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन सुरु केलं. पोलिसांनी या सर्च ऑपरेशनमध्ये हॉक फोर्स, सीआरपीएफ, कोबरा कमांडो आणि इतर पथकांचा सहभाग नोंदवला. एकूण १२ हून अधिक पथकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी या पथकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी अभिनंदन करत म्हटलं की, ‘मध्य प्रदेश सरकार लवकरच नक्षलग्रस्त भागातील नक्षलवाद्यांचा खात्मा करणार आहे. २०२६ पर्यंत राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यात येईल’.
जंगलातील चकमकीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जंगलात पळून गेलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेणे आव्हानात्मक आहे. चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर बालाघाट जिल्ह्यातील पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. पोलिसांनी महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.