दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ (File Photo)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धटका बसला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या ८ आमदारांनी दुसर्याच दिवशी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजपाला मोठा बूस्ट मिळाला आहे. तर आपची कोंडी झाली आहे.
वंदना गौर (पालम), रोहित मेहरौलिया (त्रिलोकपुरी), गिरीश सोनी (मादीपुरी), मदन लाल (कस्तुरबा नगर), राजेश ऋषी (उत्तम नगर), बीएस जून (बिजवासन), नरेश यादव (मेहरौली) आणि पवन शर्मा (आदर्श नगर) या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे आम आदमी पक्षाला रामराम ठोकणाऱ्या आठपैकी सात आमदारांना विधनसभा निवडणुकीत आपने तिकीट नाकारले होते. त्यामुळे पक्षाच् तिकीट नाकारण्याच्या निर्णयावर हे सर्व आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
मेहरौली येथील आमदार नरेश यादव यांना सुरूवातील तिकीट देण्यात आले होते पण एका गुन्ह्यात त्यांचा सहभाग उघड झाल्यानंतर त्यांनी ते परत केले. त्यानंतर आपने त्यांच्या एवजी महेंदर चौधरी यांना तिकीट दिले. नरेश यादव यांनी शुक्रवारी आपला राजीनामा दिला. आप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपण विधानसभा अध्यक्षांकडेही आपला राजीनामा दिल्याची माहिती दिली होती.
माजी आप नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली युनिटचे प्रमुख विरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दरम्यान नव्या सदस्यांचे स्वागत करत पांडा यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले. तसेच या नेत्यांनी आपदा (AAPda) पासून मुक्त केल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी ५ फेब्रुवारी रोजीच्या निवडणुकीनंतर दिल्ली देखील आपपासून मुक्त होईल असेही म्हटले.
पालमच्या आमदार भावना गौर यांनी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल आणि आम आदमी पक्षावरील विश्वास उडाल्याने आपण पक्ष सोडत असल्याचे म्हटले होचे. त्याच प्रकारे कस्तुरबा नगर येथील आमदार मदन लाल यांनी देखील अशीच भावना व्यक्त केली होती.
“मी आम आदमी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे कारण माझा तुमच्यावरील आणि पक्षावरील विश्वास उडाला आहे. कृपया तो स्वीकारा,” असे भावना गौर आणि मदन लाल हे त्यांनी पाठवलेल्या दोन स्वतंत्र पत्रामध्ये म्हटले होते.