आप अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक 2024 भाजपची राजकीय भविष्यवाणी केली (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तारखा जाहीर करण्यात येणार असून जोरदार प्रचार केला जात आहे. दिल्लीमध्ये 70 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक घेतल्या जाणार आहेत. आम आदमी पक्षाने 70 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मागील दोन टर्म दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांची सत्ता असून पुन्हा एकदा त्यांनी पूर्ण ताकदीने प्रचार सुरु केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये सभा घेण्यास सुरुवात केली असून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा देखील साधला आहे. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांनी जागांबाबत भविष्यवाणी केली आहे.
केजरीवाल यांचे भाजपबद्दल राजकीय भाकीत
आप सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या महिला सन्मान आणि संजीवनी योजनांवर भाजप नाराज झाल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. भाषणामध्ये ते म्हणाले की, दिल्लीत भाजपला 3-4 जागा सुद्धा मिळणार नाहीत. आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांनी महिला सन्मान योजनेबाबत फसवणूक केल्याचा आरोप भाजप करत आहे. याबाबत दिल्ली भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्यांनी गुरुवारी आप सुप्रिमो अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने केली.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गेल्या दोन निवडणुकांमध्ये ‘आप’चा एकतर्फी विजय
दिल्ली सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात 1,000 रुपये मासिक देयकासह मुख्यमंत्री महिला सन्मान योजना जाहीर केली होती. दिल्लीत ‘आप’ची सत्ता राहिल्यास ही रक्कम 2,100 रुपये केली जाईल, असे केजरीवाल म्हणाले होते. २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने जबरदस्त कामगिरी केली होती. या निवडणुकीत भाजपचे खातेही उघडले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 62 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ 8 जागा मिळाल्या होत्या.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दिल्लीत झालेल्या गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकल्या होत्या तर भाजपने 3 जागा जिंकल्या होत्या. 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे यावेळी देखील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा दणदणीत विजय होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अजित पवार दिल्लीच्या रिंगणात
अजित पवार देखील दिल्लीतील राजकारणामध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. अजित पवार हे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 11 उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बुरारी, बदली, मंगोलपुरी, चांदनी चौक, बल्ली मारन, छतरपूर, संगम विहार, ओखला, लक्ष्मी नगर, सीमा पुरी आणि गोकुळ पुरी या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच उमेदवारांची घोषणा देखील केली आहे. पक्षश्रेष्ठी आणि खासदारांच्या मतांनी या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आघाडीसाठी एनडीएशीही चर्चा केली जाईल असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. राष्ट्रवादीने ज्या प्रकारे उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यावरून भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले.