बंगळुरू : कर्नाटकात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसे राजकीय वातावरण तापल्याचे पाहिला मिळत आहे. त्यात आता कर्नाटकात (Karnataka Election) अमूल (Amul) आणि नंदिनी (Nandini Milk) दुधाच्या ब्रँडची तुलना केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांनी नंदिनी दुधाचा ब्रँड हा अमूलपेक्षा चांगला असल्याचे म्हटले आहे. पण सत्ताधारी भाजप अमूल हा ब्रँड कर्नाटकात आणू पाहत आहे.
कर्नाटकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दुधाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. कर्नाटकात अमूल दुधाच्या एंट्रीमुळे काँग्रेस आणि जेडीएसने कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी ब्रँडला विशेष महत्त्व दिले आहे. कर्नाटकातील जनतेला सध्या ‘नंदिनी’चे मिळणारे स्वस्त दूध काढून घेऊन अमूलचे महागडे दूध आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसमधील नेत्यांनी केला आहे. याबाबत कर्नाटक दूध महासंघाचे एस. एन. कुमार यांनी म्हटले की, ‘सध्या कर्नाटकातील लोकांना इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त दूध मिळत आहे. कर्नाटकात अमूलची एन्ट्री करून भाजप सरकार लोकांना महागाईकडे ढकलण्याचे काम करत आहे. आजही संपूर्ण देशात सर्वात स्वस्त दूध फक्त कर्नाटकातच मिळते, असा त्यांचा दावा आहे.
काँग्रेस, जेडीएसचा हल्लाबोल
दुधाच्या मुद्द्यावरून कर्नाटकातील तापलेल्या राजकारणावरून काँग्रेसने नाही तर जेडीएसनेही भाजपवर हल्लाबोल केला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी विरोध केला. ते म्हणाले की, भाजपचे डबल इंजिन सरकार केवळ कर्नाटकातील शेतकऱ्यांचीच गळचेपी करत नाही. तर कर्नाटकात अमूलच्या प्रवेशाने कन्नडिगांच्या स्वाभिमानाशी आणि अस्मितेशीही खेळत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
‘अमूल’कडून टीझर लाँच
कर्नाटक मिल्क फेडरेशन (केएमएफ) राज्यात ‘नंदिनी’ या ब्रँड नावाने दूध आणि दही विक्री करते. अमूलने बंगळुरूमध्ये आपल्या ब्रँडचा टीझर लाँच केला. ज्यामध्ये अमूल आपल्या दुग्धजन्य पदार्थांचे वितरण सक्षम करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करेल. अमूलच्या कर्नाटकप्रवेशामुळे स्थानिक ब्रँडला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






