लोकल बॉडी इलेक्शन मतदार केंद्र आणि ईव्हीएम मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाहणी केली (फोटो - सोशल मीडिया)
Pune Political News : पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. मुंबई, पुणेसह 29 महापालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. यामुळे राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे पण त्याचबरोबर प्रशासनाची देखील जोरदार तयारी सुरु आहे. महानगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मतदान यंत्र तयारी व मतमोजणी व्यवस्थेची पाहणी केली आहे.
आज दिनांक ५ जानेवारी२०२६ रोजी सकाळी भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले प्रशाला येथे व कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालय मधील न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील मतदान प्रक्रियेसंदर्भात महत्त्वपूर्ण पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) ओमप्रकाश दिवटे, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांच्यासह उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर, उपायुक्त अरविंद माळी, उपायुक्त आशा राऊत, सहायक आयुक्त तिमया जागले, महाडिक हे उपस्थित होते.
हे देखील वाचा : कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापौर होणार…; AIMIM नेत्याचा दावा
यावेळी मतदान यंत्रांची पाहणी, स्ट्रॉंग रूमची पाहणी, मतमोजणी केंद्राची पाहणी तसेच निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये मतदान यंत्रांची सुरक्षितता, स्ट्रॉंग रूम मधील संरक्षक व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, अग्निशमन सुविधांची उपलब्धता तपासणी, तसेच मतमोजणी केंद्रातील आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली. यावेळी मतदान यंत्रांची पाहणी करून तज्ज्ञ यांच्याशी संवाद साधला.
पाहणी दरम्यान आयुक्तांनी विद्युत व्यवस्था सुरक्षित ठेवणे, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रांमध्ये आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करणे, तसेच मतमोजणीची प्रक्रिया नियोजित वेळेत, पारदर्शक व सुरळीत पार पडेल यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा व नियंत्रण कक्षांची योग्य व्यवस्था करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.
हे देखील वाचा : खासदार प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीसांसोबत डील झाल्याचा बड्या नेत्याचा दावा
निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात व नियमानुसार पार पडावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. भवानी पेठ व कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालया मार्फत निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेत पुढील आवश्यक सुधारणा व कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.






