राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट; मंदिराच्या आतील मनमोहक दृश्ये आली समोर

मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी राम मंदिर सजले असून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. राम मंदिराच्या आतील काही फोटो व व्हिडिओ आता समोर आले आहेत.

    अयोध्या : अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू श्री रामांची अयोध्येमध्ये(Ayodhya) प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. भव्य राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला (Ram Mandir Inauguration) अगदी काही अवधी बाकी राहिला आहे. देशभरातून या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. देशभरामध्ये भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी राम मंदिर (Ram Mandir) सजले असून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. राम मंदिराच्या आतील काही फोटो व व्हिडिओ आता समोर आले आहेत.

    राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजली आहे. अनेक वर्षांनंतर प्रभू राम आपल्या जन्मस्थळी परतणार असल्याची भावना रामभक्तांची आहे. यामुळे सर्वत्र रामांच्या स्वागतासाठी तयारी केली जात आहे. मंदिरामध्ये उद्या दुपारी 12 नंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होणार आहे. दरम्यान, मंदिराला मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे.

    अयोध्यानगरीला तब्बल 2500 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. गर्भगृहाच्या सजावटीसाठी कर्नाटकातून फुले आणण्यात आली आहेत. मंदिराच्या बाहेर फुलांचे मोर साकारण्यात आले असून विविध रंगीबेरंगी फुलांनी मंदिराच्या गाभाऱ्याला सजवण्यात आले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये मंदिरात करण्यात आलेले बारीक नक्षीदार काम डोळ्यांना सुखद आनंद देत आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.