धीरेंद्र शास्त्री गरबा खेळण्यासाठी येणाऱ्यांवर गोमुत्र शिंपडण्याचा सल्ला दिला आहे(फोटो - सोशल मीडिया)
Dhirendra Shastri : छतरपूर : बागेश्वर धाम पीठाधीश्वर असणारे धीरेंद्र शास्त्री हे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहेत. धीरेंद्र शास्त्री हे अनेकदा हिंदू धर्म वाचवण्यासाठी धक्कादायक विधाने करताना दिसून येतात. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या तरुणांवर भाष्य केले आहे. नवरात्रीमध्ये गुजरातसह संपूर्ण देशामध्ये गरबा-दाडिंया मोठ्या उत्साहात आयोजित केल्या जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं-मुली सहभागी होत असतात. मात्र नवरात्रीमधील गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदू मुला-मुलींनी यावे असे आवाहन मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे. दरम्यान, गरबा बघायला येणाऱ्यांवर गोमुत्र शिंपडावे अशी मागणी धीरेंद्र शास्त्री यांनी केली आहे.
बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी लव्ह जिहादचे उच्चाटन करून हिंदू मुलींचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. गरबा मंडपात इतर धर्मातील लोकांच्या उपस्थितीबाबत ते म्हणाले की जर हिंदू हजला जात नसतील तर त्यांनी गरबाला उपस्थित राहू नये. शिवाय, गरबा मंडपात येणाऱ्यांवर गोमूत्र शिंपडण्याचा सल्ला त्यांनी दिला. नवरात्रोत्सव सुरू होताच, गरबा मंडपांबाबत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे विधान चर्चेचा विषय बनले आहे. यापूर्वी अनेक भाजप नेत्यांनी गरबा उत्सवांबाबत विविध विधाने केली आहेत, तर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले?
धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या त्यांच्या गावी गढ्यात आहेत. ते लवकुश नगर येथील माता बांबर बेणीला भेट देण्यासाठी गेले होते. यादरम्यान, कोणीतरी त्यांना गरबा उत्सवाबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “कोणताही सनातनी हज यात्रेला जात नाही, म्हणून आम्हालाही आवडेल की आमच्या गरबा उत्सवात इतर कोणत्याही धर्माचा कोणीही सहभागी होऊ नये.” असे विधान त्यांनी केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ
लव्ह जिहाद थांबवण्यासाठी त्यांनी सांगितले की या नवरात्रीत आपण आपले जीवन सनातन धर्माला समर्पित करण्याची प्रतिज्ञा करावी. ते म्हणाले, “हे देवी, या नवरात्रीत आपण लव्ह जिहाद संपवण्याची आणि सनातन धर्माच्या मुलींचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करावी.” धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे हे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी गरबा उत्सव आयोजित करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि समित्यांना गैर-हिंदूंना उत्सवात सहभागी होण्यापासून रोखण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की गरबा उत्सव मंडपाच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावे आणि प्रवेश करणाऱ्या लोकांवर शिंपडावे, जेणेकरून गैर-हिंदू गरबा उत्सवात प्रवेश करू शकणार नाहीत.