राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राज्यातील ओला दुष्काळ परिस्थितीवर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
Sharad Pawar News : बारामती : राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. दुष्काळी भागामध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाला आलेले पीक जमीनदोस्त झाल्यामुळे त्यांचा जीव हैराण झाला आहे. दरम्यान, राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करुन मदत द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या संदर्भात जेष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला असून अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरले आहे. अशी परिस्थिती यापूर्वी पाहिली नव्हती असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार म्हणाले की, “दुष्काळासाठी प्रसिद्ध आणि जिथे पाऊस-पाण्याची कमतरता असते अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतक-यांच्या संसारांवर झालेला आहे. साधारणपणे या महिन्यांमध्ये सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सोयाबीन हे भरवश्याचं पीक असतं. मात्र, अतिवृष्टीमुळे सोयाबीनची वाढ झाल्यानंतर पाच दिवस वाफ्यामध्ये पाणी राहिलं आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पिके कुजून गेली. त्यामुळे, त्यापासून 2025 येणारे उत्पादन शेतक-यांच्या हातात पडलेलं नाही”, असे मत शरद पवारांनी मांडले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य सरकारला देखील शरद पवारांनी आवाहन केले आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा असे देखील महायुती सरकारला सुचवले आहे. ते म्हणाले की, आपण दुष्काळ पाहिला पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कथी पाहिली नव्हती. नेहमी कमी पाऊस असणा-या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे. त्यात सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची असते. केंद्राकडे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने वेगाने पंचनामे करणं व नुकसान भरपाई देणं या दोन गोष्टी तातडीने करण आवश्यक आहे, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पीक वाहून गेलं तर त्या वर्षीचं नुकसान होतं. पण जमीन वाहून गेलीदितर त्या जमिनीची उत्पादकता कायमची कमी होते. त्यामुळे फक्त पिकांसाठी मदत करून चालणार नाही, जमिनीसाठीही मदत करावी लागेल. रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, अनेक ठिकाणी गुरे वाहून गेली. त्यामुळे शेतीसाठी समस्या निर्माण होतील. या सर्व गोष्टींकडे बघण्याची गरज आहे. हे काम राज्य सरकारला गतीनं करावं लागेल”, असे शरद पवारांनी नमूद केले आहे.