हैदराबाद : तेलंगणा आणि गुजरात या राज्यांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनेत चिनी मांजाने दोघांचा जीव घेतला. हैदराबादमध्ये चिनी मांजामुळे लष्कराच्या जवानाचा मृत्यू झाला. ड्युटी संपवून घरी जात असताना शनिवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. गुजरातमधील दुसऱ्या घटनेत वडिलांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाची मांजाने मान कापली. रक्तबंबाळ अवस्थेत मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
हैदराबादमधील विशाखापट्टणम येथील रहिवासी के. कोटेश्वर रेड्डी (वय 28) हे सैनिक हॉस्पिटलमध्ये चालक होते. ते कर्तव्य संपवून रेड्डी अट्टापूर येथील त्यांच्या निवासस्थानी जात होते. दरम्यान, लँगर राजा हाऊस उड्डाणपुलावर अचानक त्यांच्या मानेला चिनी नायलॉन मांजा लागला. यात त्यांची मान कापली. त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गुजरातमध्ये चार जण जखमी
गुजरातमधील बोर्डी गावात मकरसंक्रांतीनिमित्त गुजरात वडील मुलाला दुचाकीवर समोर बसवून घरी जात होते. खरोल गावाजवळ अपघात झाला. मुलाला तातडीने जवळच्या कोथंबा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. दुसरीकडे, राज्यातील गोध्रा शहरात चायनीज मांजामुळे चार जण जखमी झाले आहेत.