महापालिका निवडणुकीत भाजपची सरशी, १० पैकी ९ ठिकाणी काँग्रेसला चारली धूळ
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचं वारं असतानाही भाजपने कॉंग्रेसला धक्का देत विजय मिळवला होता. त्यानंतर आता पुन्हा पराभवाची धूळ चारली आहे. १० महापालिकांच्या निवडणुकीत ९ ठिकाणी विजय मिळवला आहे. कुरुक्षेत्र, करनाल, फरिदाबाद, गुरुग्राम या ठिकाणच्या निवडणुकीत भाजपाने भगवा फडकवला आहे. सात महापालिकांसाठी महापौर आणि प्रभाग सदस्य, चार नगरपरिषदा आणि २१ पंचायत समितींसाठी अध्यक्ष तसंच सदस्य निवडीसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. सोहना, असंध आणि इस्माइलबाद या तीन ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक पार पडली.
#WATCH | Chandigarh | On BJP’s victory in Haryana Municipal Corporation elections, Haryana Chief Minister Nayab Singh Saini says, “In the results of local body elections that came today, the people of Haryana have put their stamp of approval on the triple engine government… I… pic.twitter.com/FQ15XIy2kD
— ANI (@ANI) March 12, 2025
काँग्रेसची आमदार आणि माजी रेसलर विनेश फोगाटच्या जुलाना या महापालिकेतही भाजपाचा विजय झाला आहे. फरिदाबाद येथील महापौर निवडणुकीत भाजपाच्या प्रवीण पत्रा जोशी यांनी ३ लाख १६ हजार ८५२ मतं मिळवली आहेत आणि नवा विक्रम स्थापन केला आहे. हा विक्रम आधी भाजपाच्या उमेदवार सुनीता दयाळ यांच्या नावे होता. त्यांना २ लाख ८७ हजार मतं मिळाली होती.
छावणी नगरपरिषद निवडणुकीत ३२ पैकी ३५ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. अंबाला छावणी येथील जनतेने मला निकालांच्या रुपाने बक्षीसच दिलं आहे असं अनिल विज यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा पराभवच आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या या निवडणुकांमध्ये भाजपाची सरशी झाली आहे. २ मार्चला या विविध जागांसाठीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आज त्यांचे निकाल समोर आले.
हरियाणातील विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत भाजपाचाच डंका वाजणार हे निश्चितच मानलं जात होतं त्याचप्रमाणे घडलं आहे. महापालिकेसाठीच्या महापौर पदांच्या १० पैकी ९ निवडणुकांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री नायब सैनी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या निवडणुकांसाठी मेहनत घेतली होती. त्यांनी प्रचारसभा आणि रोड शो केले होते. तर काँग्रेसकडून सचिन पायलट आणि माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा प्रचारात उतरले होते. मात्र या सगळ्या निवडणुका काँग्रेसला जड गेल्या आहेत हेच निकाल सांगत आहेत. हरियाणातल्या अनेक शहरांमध्ये २ तारखेला मतदान पार पडलं. तर पानिपत या ठिकाणी ९ मार्चला मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानाची टक्केवारी ४१ टक्के इतकीच होती. मतदान कमी झालं त्याचा फायदा भाजपाला झाला अशी चर्चा आता रंगली आहे.