भाजपला कधी मिळणार राष्ट्रीय अध्यक्ष? राजनाथ सिंहांनी स्पष्टच सांगितलं
एक हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “बिहार विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला पुढील भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांचे नाव ऐकायला मिळेल. आमच्या पक्षात कोणताही मतभेद नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या कोणत्याही राजकीय निर्णयात हस्तक्षेप करत नाही,मी लहानपणापासूनच आरएसएसशी जोडलेलो आहे. आरएसएस देशभक्ती जागृत करण्याचे काम करते, असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.
राजनाथ सिंह म्हणाले, ” पुढील अध्यक्ष पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. जेपी नड्डा यांनी पहिल्यांदा २०१९ मध्ये कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि २०२० मध्ये त्यांची अधिकृत निवड झाली. नड्डा यांना अलीकडेच आरोग्य आणि रसायने आणि खते मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकींवर भाष्य केलं. “बिहारमध्ये एनडीएचा विजय होईल आणि पुढील पाच वर्षे बिहारमध्ये एनडीएची सत्ता असेल, जनतेच्या प्रतिसादामुळे आम्ही सरकार स्थापन करू आणि दोन तृतीयांश बहुमत मिळवू. बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजप अध्यक्षपदासाठी शर्यत : शिवराज, खट्टर, यादव आणि प्रधान आघाडीवर
भाजप अध्यक्षपदासाठी नवे नेतृत्व ठरवण्याची प्रक्रिया सुरू असून अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान ही प्रमुख नावे आघाडीवर आहेत.
भाजप नेहमीच धक्कातंत्रासाठी ओळखला जात असल्याने या यादीत अजून एखादे नवीन आणि अनपेक्षित नाव जोडले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीनंतरच या राजकीय शर्यतीचा निकाल लागेल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.






