'अशी सूत्रं आम्ही मूत्र मानतो'; मीडियावर टीका करताना तेजस्वी यादवांची जीभ घसरली
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतायेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. या दौऱ्यांदरम्यान त्यांनी अनेकवेळा माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला होता. दरम्यान आजही त्यांनी माध्यमांवर खालच्या पातळीवर टीका केली. मी अशा सूत्रांना मूत्र मानतो, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. भाजपने यावरून तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
प्रत्यक्षात तेजस्वी यादव पत्रकार परिषद घेत होते आणि यावेळी माध्यमांनी त्यांना काही प्रश्न विचारले. यावर ते म्हणाले की तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली? ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, मी अशा स्रोतांना मूत्र मानतो, अशा शब्दात त्यांनी टीका केली. असं वृत्त एका डीजिटल वृत्त वाहिनीने दिलं आहे.
तेजस्वी यांनी काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांवर नाराजी व्यक्त केली होती. लालू प्रसाद यादव यांच्या राजवटीत लहानात लहान गुन्हाही पहिल्या पानावर छापला जात होता. आज विरोधकांना कव्हरेज मिळत नाही. मी माध्यमांना सांगू इच्छितो की स्वतःला सुधारा, अजूनही वेळ आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजपने तेजस्वी यांच्या विधानावर तीव्र हल्ला चढवला आहे. भाजपचे प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान म्हणाले की तेजस्वी यादव पत्रकारांना उघडपणे इशारा देत आहेत आणि धमकावत आहेत. त्यांनी सांगावे की त्यांना कोणाला घाबरवायचे आहे? हे विधान प्रेस स्वातंत्र्यावर थेट हल्ला आहे. पासवान म्हणाले, ‘लालूंच्या राजवटीत पत्रकारांवर हल्ल्यांचा इतिहास आहे. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनाचा संदर्भ देत ते म्हणाले की त्या काळातही माध्यम स्वातंत्र्य दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि आज राजदची वृत्ती त्याच मानसिकतेची आठवण करून देते, असं त्यांनी म्हटलं आहे.
लालू यादव यांच्या राजवटीत पत्रकारांवर झालेल्या हत्येच्या घटना
१९९१ मध्ये गया येथे अशोक प्रसाद यांची हत्या
१९९४ मध्ये सीतामढी येथे दिनेश दिनकर यांची हत्या
१९९७ मध्ये गोपाळगंज येथील हिंदुस्तान वृत्तपत्राच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला
१९९९ मध्ये सिवान येथील दूरदर्शन कार्यालयावर हल्ला
मधुबनी येथे ज्येष्ठ पत्रकार चंद्रिका राय यांच्यावर हल्ला झाला.