तर निवडणुकीवर बहिष्कार घालणार, तेजस्वी यादव यांचं मोठं विधान
बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचं राजकीय वातावरण तापू लागलं असताना, विरोधकांकडून मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी निवडणूक बहिष्काराच्या पर्यायावरही विचार केला जाऊ शकतो, असा सूचक इशारा दिला आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
विरोधक एकत्र येऊन निवडणुकीवर बहिष्कार घालू शकतात का, तेव्हा तेजस्वी यादव म्हणाले, “या विषयावरही चर्चा होऊ शकते. आम्ही पाहू की जनतेची भावना काय आहे आणि इतर सर्व पक्षांची यावर काय भूमिका आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीसाठी विरोधक कोणतीही टोकाची भूमिका घेण्याची शक्यता आहे.
बिहारमधील विरोधकांमध्ये एकत्र येण्याचे आणि सरकारविरोधात प्रभावी रणनीती ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावेळी तेजस्वी यादव यांनी हे विधान केलं आहे. कोणताही निर्णय घेताना जनतेची भावना आणि सर्व घटक पक्षांच्या एकमताला प्राधान्य दिलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सध्या बिहारमध्ये SIR म्हणजे मतदार यादी विशेष फेरपडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. निवडणूक आयोगाने 28 जून 2025 पासून ही प्रक्रिया सुरू केली असून, यात मतदार यादीतील नावांची पडताळणी व दुरुस्त्या केल्या जात आहेत. 1 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, अंतिम यादी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जाहीर होणार आहे. यामुळे निवडणूक तयारीला सुरुवात झाल्याचं स्पष्ट आहे.
मोठी बातमी! मतदार यादीतून तब्बल ५१ लाख मतदारांची नावं वगळणार, बिहारच्या राजकारणात खळबळ
दरम्यान, बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, RJD आमदार भाई वीरेंद्र यांनी केलेल्या टिप्पणीनंतर सभागृहात गोंधळ उडाला.
ही सर्व घडामोडी पाहता, येत्या काही महिन्यांत बिहारच्या राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची शक्यता असून, विरोधक निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यास ती एक ऐतिहासिक राजकीय घडामोड ठरू शकते. तेजस्वी यादव यांचे वक्तव्य हे त्याच दिशेने सूचक मानलं जातं आहे.