International Women’s Day 2025 : ‘जेएनयू’ झाले ‘शांति’प्रिय; डॉ. शांतिश्री पंडीत यांच्या प्रयत्नातून कॅम्पसचा कायापालट (File Photo)
नवी दिल्ली / सागर सावंत : ‘केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे’ या वाक्याचा नेमका अर्थ दिल्ली दौऱ्यानिमित्त ‘जेएनयू’ भेटीत आला. देशातील शिक्षणक्षेत्रात नामवंत असलेले व नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेले ‘जेएनयू’ अर्थात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दौऱ्यादरम्यान येथे असणारा बदल जाणवला. नेहमीच डाव्या आणि उजव्या अशा दोन गटात दुभंगलेले व नेहमीच आंदोलन, राडा व तणावाच्या वातावरणात असलेले ‘जेएनयू’ मात्र आता ‘शांति’प्रिय झाले आहे. हा सारा बदल कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडीत यांनी पदभार स्वीकारल्यापासून झाला आहे.
नुकताच दिल्ली अभ्यास दौऱ्या निमित्ताने ‘जेएनयू’ला भेट दिली. यावेळी प्रो. रोहन चौधरी आणि व्हा. चान्सलर यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. मूळच्या दक्षिण भारतातील असलेल्या व सासर पुणे असलेल्या डॉ. शांतिश्री पंडीत यांनी एकूणच ‘जेएनयू’चा कायापालट केला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी कन्हैय्या कुमार यांनी केलेल्या आंदोलनामुळे जेएनयू चर्चेत आले होते. याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते.
डॉ. पंडीत यांनी पदभार स्वीकारल्यापासून कॅम्पसमध्ये शांतता आहे. यापूर्वी डावे व उजवे, इतर संघटना यांच्यामध्ये नेहमीच वैचारिक वाद व मारहाणीच्या घटना घडत असत. यामुळे जेएनयू जगभर चर्चेत होते. मात्र, अडीच वर्षांपूर्वी डॉ. पंडीत यांनी २०२२ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांना मोकळेपणे बोलण्याची व व्यक्त होण्याची संधी दिली जात आहे.
तसेच कोणत्याही प्रकारचा वाद झाल्यास दंड केला जातो. त्यांच्या या सूचनांचे पालन करत विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन केले जाते. यामुळे सध्या युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये शांततेचे वातावरण आहे. येथील प्रत्येक विभागाच्या भिंतींवर विविध कलाकृती व चित्रे रेखाटलेली आहेत, या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थी आपले मत व्यक्त करतात. यासाठी युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून कोणतेही बंधन लादले जात नाही. २००० एकर इतका कँम्पस आहे. संपूर्ण कॅम्पसमध्ये विविध युनिट्स आहेत. एकेकाळी अशांत असलेला नेहमीच पोलिसांच्या छावणीचे स्वरुप असलेला जेएनयूचा हा कॅम्पस मात्र सध्या ‘शांति’प्रिय झाला आहे.
डॉ. पंडीत यांच्या प्रयत्नातून ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा’ अभ्यासक्रम
जेएनयूमध्ये व्हा. चान्सलर यांच्या प्रयत्नातून नव्याने लवकरच ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा’ याविषयावर विशेष केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी विशेष तरतूद देखील करण्यात आली आहे. या केंद्राच्या बाहेर छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा उभरण्यात येणार आहे. या केंद्रासाठी राज्य शासनाकडून १० कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. या विशेष केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थी दिल्लीत येत नसल्याची खंत
व्हा. चान्सलर पंडीत म्हणाल्या, पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यवहारिक शिक्षणावर जास्त भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास होऊन बाहेर पडल्यानंतर याचा मोठा फायदा होतो. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी ‘जेएनयू’मध्ये शिकण्यासाठी येत नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच त्यांनी पुण्यातील जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.