नवी दिल्ली – पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराजवळ निहंग शिखांनी एका व्यक्तीची हत्या केली आहे. हत्येची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फॅक्टरी कामगार असणारी पीडित व्यक्ती तंबाखूचं सेवन करत असल्याने हत्या करण्यात आल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात दोन निहंग शीख होते. मात्र या घटनेचं संपूर्ण सीसीटीव्ही समोर आलं असून, यामध्ये हत्येपूर्वी पीडित व्यक्ती एका महिलेशी बोलत असल्याचं दिसत आहे. यामुळे या प्रकरणातील गूढ वाढलं आहे.
हरमनजीत सिंग असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. पोलीस आयुक्त अरुणपाल सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की, “त्याने तंबाखू आणि मद्याचं सेवन केलं असल्याने निहंग शीखांनी त्याच्यावर हल्ला केला. मंदिरापासून फक्त एक किमी अंतरावर ही घटना घडली आहे”. घटनास्थळी सहा ते सात लोक असताना एकाही व्यक्तीने पोलिसांना फोन केला नाही हे लाजिरवाणं असल्याचं ते म्हणाले आहेत.