पंजाब : पंजाबमधील काँग्रेसचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पंजाबमध्ये अंतर्गत कलहाचा सामना करणाऱ्या काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांचे भाऊ मनोहर सिंग चन्नी यांनी आता पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. मनोहर सिंग चन्नी यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली. या यादीत मुख्यमंत्री चरणजी सिंह चन्नी यांचे बंधू मनोहर सिंह चन्नी यांचे नाव नसल्याने पक्षातून बंडखोरी केली आहे. काँग्रेसमधून नाराज झालेल्या मनोहर सिंह चन्नी यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली आहे.
निवडुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा सिलसिला यंदाही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. अमृतसह जिल्ह्यातील काँग्रेस समितीच्या ग्रामिण विभागाचे अध्यक्ष भगवंतपाल सिंह यांच्यासह काँग्रेसच्या पाच ज्येष्ठ नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रदीप सिंह भुल्लर, रतन सिंह सोहल, परमजीत सिंह रंधावा आणि तंजिंदरपाल सिंह यांचा समावेश आहे.
दरम्यान, काँग्रेसने शनिवारी ८६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, पक्षाने अद्याप जगराव जागेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे दावेदारांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत. याचे एक कारण म्हणजे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे बंधू डॉ. मनोहर सिंग यांनी बस्सी पठाणातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा. या जागेवर काँग्रेस मनोहर सिंग यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करू शकते.