Abhijit Dipke Jaipur assault: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण
Abhijit Dipke Jaipur assault: राजस्थानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये त्यांच्या आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याची माहिती आहे. अभिजित दीपके रविवारी रात्री उशिरा जयपूरमध्ये दाखल झाले.
आज सकाळी जयपूर येथील शासकीय वसतिगृहात असलेल्या शहीद स्मारकाजवळ मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काही अज्ञातांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोशल मीडियावरून सुरू झालेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ची चळवळ आता देशभर विस्तारत चालली आहे. या चळवळीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीनंतर विविध शहरांमध्ये आंदोलनांची मालिका सुरू केली आहे. नवी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर पुण्यात विद्यापीठ परिसरात CJPचे मोठे आंदोलन झाले. त्यानंतर हैदराबादमध्ये आंदोलन झाले. त्यानंतर आता त्यांनी राजस्थानची राजधानी जयपूर येथे आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने गर्दीत घुसून अभिजीत दिपके यांच्या कानशिलात लगावली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला.
घटनेनंतर दिपके यांच्या समर्थकांनी संबंधित तरुणाला तात्काळ पकडून त्यालाही बेदम मारहाण केल्याचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनस्थळी धावपळ उडाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या घटनेनंतर अभिजीत दिपके यांच्या समर्थकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, हल्लेखोराविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जयपूरमधील या घटनेमुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची पुन्हा एकदा देशभर चर्चा सुरू झाली असून, पुढील काळात या चळवळीच्या आंदोलनांकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






