'तृणमूल' मध्ये बंडखोरीला नवे वळण, बंडखोर खासदार होणार नव्या पक्षात विलीन, NDA ला देणार पाठिंबा?
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. तृणमूल काँग्रेस (TMC) मधील बंडखोर गटाने पक्ष नेतृत्वाविरोधातील नाराजी आणखी तीव्र करत नवा राजकीय मार्ग स्वीकारण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. या गटातील काही खासदार लवकरच नेशनलिस्ट सिटीजन पार्टीमध्ये विलीन होऊ शकतात, अशी माहिती समोर येत असून त्यामुळे बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोर गट केवळ नवीन पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत नाही, तर NDA ला पाठिंबा देण्याचाही विचार करत आहे. या घडामोडींमुळे पश्चिम बंगालसह ईशान्य भारतातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेशनलिस्ट सिटीजन पार्टी ही निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असली तरी राष्ट्रीय स्तरावर अद्याप प्रभाव निर्माण करू शकलेली नाही. आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये या पक्षाचे मर्यादित अस्तित्व आहे. स्थानिक प्रश्न, प्रादेशिक ओळख आणि नागरिकांच्या हक्कांशी संबंधित मुद्द्यांवर पक्ष काम करत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, बंडखोर खासदारांना स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याचे नियोजन करण्यात आले असून संसदेत स्वतंत्र ओळख मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, या घडामोडींमध्ये सहभागी असलेल्या खासदारांची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नेमके किती खासदार या नव्या राजकीय समीकरणात सहभागी होणार आणि त्याचा TMCच्या ताकदीवर किती परिणाम होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली TMC मजबूत स्थितीत असली तरी पक्षातील असंतोष आता उघडपणे समोर येऊ लागल्याची चर्चा आहे. आगामी काळात या बंडखोर गटाची पुढील भूमिका काय असेल आणि त्याचा राष्ट्रीय राजकारणावर किती परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या तरी या संभाव्य विलयाबाबत आणि NDAला पाठिंबा देण्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी राजकीय घडामोडींनी वेग घेतल्यामुळे बंगालच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे.






