बंगळुरु : कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Elections 2023) चुरशीच्या लढतीत काँग्रेसनं भाजपावर मात केल्याचं दिसत आहे. निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात काँग्रेसला यश मिळता ना दिसतं आहे. एकूण 224 जागांपैकी 113 या बहुमताच्या दिशेनं काँग्रेस पोहचले अशी शक्यता दिसते आहे. भाजपालाही 80 च्या घरात जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जेडीएसला सोबत घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. अशात कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी काँग्रेसनं तातडीनं पावलं उचललेली दिसतायेत.
विजयी उमेदवारांना तातडीनं एयरलिफ्ट करुन बंगळुरात आणण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हेही सक्रिय झालेले आहेत. आमदारांना एयर लिफ्ट करण्यासाठी तीन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. बंगळुरातून या आमदारांना हैद्राबादला नेण्यात येण्याची शक्यता आहे.
डी. के. शिवकुमार काँग्रेसकडून सक्रिय
सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती ही काँग्रेससाठी चिंताजनक आहे. बहुमताच्या जवळ असताना सत्तास्थापनेची संधी गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी काँग्रेस सतर्क दिसते आहे. यापूर्वी अनेकदा काँग्रेसनं हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गनावलेला आहे. अशा स्थितीत कोणतीही रिस्क घेण्याची सध्या काँग्रेसची तयारी दिसत नाहीये. काँग्रेसला बहुमत मिळालं तर उद्याच आमदारांची बैठक घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे.
जेडीएसशीही चर्चा सुरु असल्याची माहिती
काँग्रेसला जर सत्ता स्थापण्यासाठी काही जागा कमी पडल्या तर जेडीएसशीही संपर्क सुरु असल्याची माहिती आहे. एचडी कुमारस्वामी यांची भूमिकाही यात महत्त्वाची ठरणार आहे. ते भाजपासोबत जाणार की काँग्रेससोबत यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं तर जेडीएसचा प्रश्न येणार नाही., मात्र काँग्रेस सध्या सावध भूमिकेत आहे.