काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद(Salman Khurshid) यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’(Sunrise Over Ayodhya : Nationhood In Our Times) या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकामध्ये सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम(Comparison Of Hindutva With ISIS) या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या पुस्तकातील संदंर्भावर भाजपाकडून टीका करताना ‘मुस्लिम मतांसाठी भगवा दहशतवादसारख्या कल्पना वापरणाऱ्या पक्षाच्या सदस्याकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते?’ असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.
‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकातल्या ‘द सॅफ्रॉन स्काय’ या प्रकरणामध्ये सलमान खुर्शिद यांनी ही तुलना केली आहे “ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे”, असं या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. पुस्तकाच्या पान क्रमांक ११३ वर हा उल्लेख करण्यात आलेला आहे. या मुद्द्यावरून सध्या वाद निर्माण झाला असून या पुस्तकावर आणि सलमान खुर्शिद यांच्यावर टीका केली जात आहे.
Congress’s Salman Khurshid in his new book writes that Hindutva is similar to the jihadist Islamist groups like ISIS and Biko Haram.
What else can we expect from someone whose party coined the term Saffron terror just to draw equivalence with Islamic jihad, to get Muslim votes? pic.twitter.com/3OikNQJ3qt
— Amit Malviya (@amitmalviya) November 10, 2021
भाजपा नेते अमित मालविय यांनी यासंदर्भात ट्विट करून खुर्शिद यांना लक्ष्य केलं आहे. “काँग्रेसचे सलमान खुर्शिद त्यांच्या नवीन पुस्तकात म्हणतात हिंदुत्व हे आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांसारखं आहे. ज्यांनी मुस्लिम मतं मिळवण्याकरता भगवा दहशतवाद नावाच्या कल्पनेचा वापर केला, अशा पक्षाच्या सदस्याकडून अजून काय अपेक्षा ठेवता येऊ शकते?” असा सवाल मालवीय यांनी ट्विटमध्ये केला आहे.आपल्या ट्विटमध्ये मालवीय यांनी वादात सापडलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ पुस्तकातल्या त्या उल्लेखाचा फोटो देखील शेअर केला आहे.
दरम्यान, सलमान खुर्शिद यांच्याविरोधात दिल्लीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीस्थित वकील विवेक गर्ग यांनी ही तक्रार दाखल केली आहे. “हिंदुत्वाची तुलना दहशतवादाशी करून खुर्शिद यांनी हिंदुत्वाची प्रतिमा मलीन केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा”, अशी मागणी त्यांनी केली आहे.