फोटो सौजन्य - Social Media
वाशिमहून अनसिंगच्या दिशेने जात असताना झालेल्या भीषण कार अपघातात अनसिंग येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेले सात जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना वाशिम–अनसिंग मार्गावरील बाभुळगाव फाट्याजवळ शनिवारी (दि. ३) पहाटे घडली. या अपघातात अभय शिवाजी सातव (वय २६, रा. अनसिंग) याचा मृत्यू झाला असून, तरुणाच्या अकाली निधनामुळे अनसिंगसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनसिंग येथील काही तरुण एमएच ४६ / बीव्ही-०३७४ क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या कारने वाशिम येथे गेले होते. वाशिम येथील काम आटोपून हे सर्वजण पहाटे गावी परतत असताना बाभुळगाव फाट्यानजीक कारचालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात आदळल्याने हा भीषण अपघात झाला.
अपघात इतका गंभीर होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत अभय सातव याचा गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात ओम चंद्रवंशी, पवन नाळे, विकास गोरे, गणेश राऊत, सागर गव्हाणे, अक्षय कदम आणि गणेश गाडे हे सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या सर्व जखमींवर वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व इतर यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार भरधाव वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटणे हे अपघाताचे कारण असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मृत अभय सातव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन महिन्यांची चिमुकली मुलगी आणि बहीण असा मोठा आप्त परिवार आहे. अवघ्या २६व्या वर्षी झालेल्या या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अनसिंग गावात शोककळा पसरली आहे. तरुणाच्या निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेस वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून वाहनचालकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.






