खासदार राहुल कासवान यांचा भाजपला रामराम; मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत केला काँग्रेसमध्ये प्रवेश

राजस्थानमधील चुरू येथील भाजप खासदार राहुल कासवान (Rahul Kaswan) यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतसरा हे यावेळी उपस्थित होते.

    नवी दिल्ली : राजस्थानमधील चुरू येथील भाजप खासदार राहुल कासवान (Rahul Kaswan) यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतसरा हे यावेळी उपस्थित होते.

    भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारल्यामुळे कासवान नाराज झाले होते. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी कासवान यांनी भाजप आणि संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले होते की, तुम्हा सर्वांच्या भावना लक्षात घेऊन मी सार्वजनिक जीवनात मोठा निर्णय घेणार आहे. राजकीय कारणास्तव मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देत आहे.

    देवेंद्र झाझरिया यांना उमेदवारी जाहीर

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 2 मार्चला राजस्थानमधील 25 पैकी 15 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह चार केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने चुरू मतदारसंघातून नवा चेहरा म्हणून देवेंद्र झाझरिया यांना उमेदवारी दिली आहे. झाझरिया यांनी पॅरालिम्पिकमध्ये दोनदा सुवर्णपदक आणि एकदा रौप्यपदक पटकावले.