दिल्ली बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील दिल्लीत फिरणाऱ्या त्या लाल रंगाच्या कारचा शोध सुरू
Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणानंतर दिल्लीसह संपूर्ण देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यत या प्रकरणात पोलिसांनी काही दहशतवाद्यांची धरपकड केली आहे. पण अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर दिल्ली पोलीस आता एका लाल रंगाच्या कारचा शोध घेत आहेत. संशयित कार लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार आहे. दिल्ली पोलिसांची पाच पथके या कारचा शोध घेत आहेत.
पोलिसांच्या तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी आढळून आल्या आहेत. दिल्लीत सोमवारी सांयकाळी झालेल्या स्फोटात आय २० कारमध्ये स्फोट झाला.या कारचे काही सीसीटीव्ही फुटेही आढळून आले. त्यानंतर आता लाल कारचा शोध घेण्यासाठी दिल्लीतील सर्व पोलिस स्टेशन, पोलिस चौक्या आणि सीमा चौक्यांना सतर्क करण्यात आले आहे. लाल कारबाबत उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे.
सोमवारी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी तपास वेगाने सुरू केला आहे. एनआयएकडे आधीच तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एनआयएचे पथक स्फोटस्थळाची तपासणी करत आहे आणि नुकसान झालेल्या वाहनांचीही तपासणी करत आहे.
स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणात तपास आणि छापेमारी सुरू आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. त्यानंतरी दिल्लीतील सर्व प्रवेश आणि बाहेर जाणाऱ्या ठिकाणांवर निमलष्करी दलांसह मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
कडक सुरक्षा उपायांचा एक भाग म्हणून, शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल नजरेआड होऊ नये यासाठी बाजारपेठा, मेट्रो स्टेशन, रेल्वे टर्मिनल आणि बस टर्मिनलमध्ये वाहनांची तपासणी केली जात आहे.
Bihar Crime: आधी अपहरण केलं, सामूहिक बलात्कार केला, नंतर २४ तासांत गावात आणून फेकून दिलं
दिल्लीतील स्फोटाच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात तपास यंत्रणांकडून पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्फोटाच्या ठिकाणाजवळ विखुरलेले सूक्ष्म कण आणि अवशेष तपासकर्ते काळजीपूर्वक जमा करत आहेत. प्रत्येक छोटा तपशील गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी लाजपत राय मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. हे मार्केट स्फोटस्थळापासून काही पावलांच्या अंतरावर असून व्यापाऱ्यांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील अनेक दुकानांवर आणि रस्त्यांवर स्फोटाचे कण आढळल्याने पोलिस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ त्यांचे नमुने गोळा करत आहेत.
दरम्यान, लाल किल्ला मेट्रो स्टेशन आणि त्यासमोरील मुख्य रस्ता देखील तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. तपास संस्थांच्या मते, लोकांच्या हालचालीमुळे घटनास्थळी असलेले पुरावे नष्ट होऊ शकतात आणि फॉरेन्सिक टीमच्या तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून तपास सुरू आहे.






