संस्कृती बालगुडे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे अनेक फोटोशूट असो वा तिचे प्रोजेक्ट्स असोत चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. गेल्या काही दिवसांपासून तिने केलेले कृष्णाचे फोटोशूट खूपच चर्चेत आहे आणि त्याला वेगळे महत्त्वही प्राप्त झाले आहे कारण संस्कृती ‘संभवामि युगे युगे’ हा खास शो प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या शो च्या निमित्तानेच ‘नवराष्ट्र’ने संस्कृतीसह याबाबत खास बातचीत केली.
संस्कृतीने या शो ची संकल्पना आणि कोणत्या पद्धतीने हा शो होणार आहे. तसंच हा शो करण्यामागे काय कारण आहे आणि या शो साठी कृष्णाचीच व्यक्तिरेखा का निवडली याबाबत अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. संस्कृतीच्या चाहत्यांसाठी हा शो नक्कीच पर्वणी ठरणार आहे. पण आपण जाणून घेऊया या शो बाबत अधिक माहिती.
संंस्कृती तुला ही संंकल्पना कशी सुचली?
‘मी भरतनाट्यम डान्सर आहे आणि गेले दीड वर्ष रियाज चालू आहे. नृत्य हा अत्यंत आवडीचा विषय आहे आणि गेल्या १ वर्षापासून आपण ज्या नृत्यात पारंगत आहोत, त्यामध्ये काहीतरी वेगळं करावं असा विचार चालू होता. बरेचदा आपण कथक नृत्याबाबत लोकांमध्ये असणारी जागृती पाहतो पण भरतनाट्यमबाबत असं अनेकदा झालेलं पाहत नाही. मला भरतनाट्यम कशा पद्धतीने प्रमोट करता येईल हे पहायचं होतं आणि खरंतर तशी मनापासून इच्छा आहे आणि माझ्याद्वारे लोकांपर्यंत आणि चाहत्यांपर्यंत पोहचावं याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. कारण भरतनाट्यमचादेखील प्रसार व्हावा असं मनापासून वाटतं’ असे संस्कृतीने मनसोक्तपणे आणि मनमोकळेपणाने सांगितले.
संस्कृतीच्या ‘संभवामी युगे युगे’साठी सुमित राघवन देणार कृष्णाचा आवाज, म्हणाले ‘मी म्हणालो कारण…’
नक्की कसे असणार संभवामि युगे युगे?
‘प्रत्येक Drama हा इंटरेस्टिंगच असतो आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी दोन भागांमध्येच हा प्रयोगदेखील असेल. यामध्ये कृष्णाची दोन पर्व असतील. पहिल्या पर्वात गोकुळातील कृष्ण आणि दुसऱ्या पर्वात हस्तिनापूरमधील कृष्ण साकारण्यात येणार आहे. ही भूमिका साकारताना कृष्णनीती महत्त्वाची आहे’ असे आवर्जून संस्कृतीने सांगितले आणि याशिवाय ती म्हणाली, ‘कृष्णनीती आजपर्यंत लोकांसमोर आलेली नाही. कोणतीही गोष्ट कृष्णाने करण्याआधी त्याची मानसिकता काय होती हे लोकांना माहीतच नाही. महाभारतात कृष्ण असे वागला अथवा त्याने सल्ला दिला तर तो का दिला त्याची मागची कारणं काय आहेत हे आपण या प्रयोगातून लोकांपर्यंत पोहचवणार आहोत. अर्थाततच ‘कृष्णाच्या नजरेतून कृष्णाचं आयुष्य’ पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे आणि आम्ही त्याची तयारी करत आहोत. कृष्ण अशा पद्धतीने आम्हाला लोकांपर्यंत पोहचवायचा आहे’ असंही संस्कृतीने सांगितले.
कृष्णासाठी सुमित राघवनचा आवाज का?
यावर अगदी उत्साहाने संस्कृती म्हणाली, ‘माझ्यासाठी खरं तर ही Fan Moment आहे. सुमित दादाचं काम कोणाला आवडत नाही असं नाही. मी जेव्हा या शो बाबत त्याला सांगितलं तेव्हा तो Narration ऐकायला तयार झाला हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं. त्याने होकार दिला आणि आयुष्यच सार्थ झालं.’ यानंतर संस्कृतीने सुमीत राघवनचा आवाज कृष्णासाठी का हे सांगताना म्हणाली, ‘कृष्णाचा आवाज खूप तरूण वा अगदी Senior असेल असा नको होता. कृष्णाच्या आवाजासाठी खोली असणं खूपच गरजेचे होते आणि तसा आवाज सुमीत दादाचा असल्याने त्याची निवड केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवाज रेकॉर्ड करताना मला जसं हवं होतं तसंच सुपरकाम सुमीत दादाने केलं आहे त्यामुळे मलाही समाधान आहे’
हा कार्यक्रम किती वेळाचा असणार?
‘संभवामि युगे युगे’ हे दोन भागात नाटकाप्रमाणेच असणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा कार्यक्रम साधारण दीड ते दोन तासाचा असेल असं संस्कृतीने सांगितलं. याशिवाय हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला डिसेंबर महिन्यात येणार आहे असंही तिने सांगितलं मात्र त्याची अजून तारीख ठरलेली नाही आणि ती लवकरच प्रेक्षकांसाठी जाहीर करण्यात येणार असल्याचं संस्कृती म्हणाली.
संस्कृती बालगुडेचा ‘कृष्ण’ अवतार सोशल मीडियावर व्हायरल, नवीन प्रोजेक्टची झलक की खास फोटोशूट?
तुझे येणारे नवे प्रोजेक्ट्स कोणते आहेत?
दोन ते चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढच्या वर्षी हे चित्रपट कदाचित प्रदर्शित होतील आणि या सर्व चित्रपटांसाठी ती उत्सुक असल्याचं तिने सांगितलं. तसंच चित्रपटांशिवाय ‘संभवामि युगे युगे’ कार्यक्रमाचे सादरीकरणही संस्कृती आपल्या टीमसह करणार आहे. डिसेंबरपासून या कार्यक्रमाच्या प्रयोगांना सुरूवात करण्यात येईल.






