File Photo : Arvind Kejriwal
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर (Delhi Liquor Policy) आहेत. आता त्यांच्या जामिनावरून त्यांनी दिल्ली न्यायालयात धाव घेतली. त्यांनी ‘राऊस एव्हेन्यू’ येथील ट्रायल कोर्टात नियमित याचिका दाखल केली. दुसऱ्या अर्जात त्यांनी प्रकृतीचे कारण देत 7 अंतरिम जामिनही मागितला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, काही दिवसांसाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यातच विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी नोटीस बजावली आणि दोन्ही याचिकांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) उत्तर मागितले. ‘ईडी’तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. ते मान्य करत न्यायालयाने पुढील सुनावणी 1 जून रोजी निश्चित केली. केजरीवाल यांना ट्रायल कोर्टातून दिलासा न मिळाल्यास त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करून तुरुंगात जावे लागेल.
सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या प्रमुखांना निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी 21 दिवसांचा दिलासा दिला आहे. पण आता तब्येत बिघडल्याचे सांगून केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जामिनाची मुदत 7 दिवसांनी वाढवण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. यानंतर केजरीवाल यांनी ट्रायल कोर्टात धाव घेतली आहे. आता यावर उद्या सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.