atishi marlena- pani satyagrah
नवी दिल्ली : दिल्लीतील पाणीटंचाईवर बेमुदत उपोषणाला बसलेल्या जलमंत्री आतिशी मार्लेना यांची रात्री तीनच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडली. त्यांना लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलच्या (एलएनजेपी) आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची शुगर लेव्हल खाली गेल्याने त्यांना घाईघाईने उपचारासाठी दाखल करण्यात आले. आतिशी मार्लेना यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
हरियाणा दिल्लीच्या वाट्याचे पाणी देत नसल्याचे आरोप करत गेल्या चार दिवसांपासून जलमंत्री आतिशी या बेमुदत उपोषणावर बसल्या आहेत. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, सौरभ भारद्वाज, आम आदमी पक्षाचे आमदार दिलीप पांडे आणि गोपाल राय हे देखील त्यांना तातडीने डॉक्टरांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले.
आम आदमी पार्टीने ट्विट करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ‘आतिशी यांच्या रक्तातील साखरेची पातळी मध्यरात्री 43 आणि पहाटे 3 वाजता 36 पर्यंत घसरली, त्यानंतर त्यांना एलएनजेपी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालायात दाखल करण्यास सांगितले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांनी काहीही खाल्लेले नाही आणि हरियाणाने दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडावे या मागणीसाठी त्या बेमुदत उपोषणावर आहे.’
दरम्यान, चौथ्या दिवशी तृणमुल काँग्रेसच्या खासदारांचे शिष्टमंडळ जलमंत्री आतिशी यांच्या समर्थनार्थ दिल्लीत दाखल झाले आणि त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. सर्व खासदारांनी आतिशी यांच्या संघर्षाचे कौतुक केले आणि संसदेत दिल्लीशी एकजुटीने आवाज उठवण्याचे वचन दिले.
आतिशी 21 जूनपासून उपोषण करत होत्या, दिल्लीत पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिल्लीतील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी हरियाणामधून 100 एमजीडी पाणी सोडण्याची मागणी करत आहेत. करारानुसार हरियाणातून 613 एमजीडी पाणी पाठवावे लागते. हरियाणा सरकार फक्त 513 एमजीडी पाणी पाठवत असल्याचा आतिशीचा दावा आहे. त्यामुळे दिल्लीतील 28 लाख लोकांना पाणी मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दिल्लीतील पाण्याच्या संकटाची दोन कारणे आहेत. यातील पहिले म्हणजे उष्णता आणि शेजारील राज्यांवर अवलंबून राहणे. दिल्लीला स्वतःचा कोणताही जलस्त्रोत नाही. त्यामुळे दिल्लीला पाण्यासाठी शेजारील राज्यांवर अवलंबून राहावे लागते. दिल्ली जल बोर्डाच्या म्हणण्यानुसार, या वर्षी दिल्लीला दररोज 321 दशलक्ष गॅलन पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
तसेच, राज्याला दररोज 129 कोटी गॅलन पाण्याची गरज आहे. मात्र, उन्हाळ्यात केवळ 969 दशलक्ष गॅलन रोजची मागणी पूर्ण होत आहे. म्हणजेच दिल्लीच्या 2.30 कोटी लोकसंख्येला दररोज 129 कोटी गॅलन पाण्याची गरज आहे, परंतु त्यांना फक्त 96.9 कोटी गॅलन पाणी मिळत आहे.