राधा राणी जन्मोत्सवादरम्यान मथुरेच्या बरसाना येथे भाविकांची गर्दी झाली होती. या काळात दोघांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा आढावा घेतला. सध्या या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे
मथुरा : सण उत्सवादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन एखादी दुर्घटना होते. सध्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शना दरम्यान अनेक भाविकांना धक्काबुक्की होत असल्याची तक्रार होत आहे. आता उत्तर प्रदेशमधूनही धक्कादायक बातमी समोर येत आहे. मथुरा येथे राधाष्टमी उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी होऊन दोन भाविकांचा मृत्यू (Devotees Died In Mathura) झाल्याची माहिती समोर येत आहे. या उत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाल्याने ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.
[read_also content=”मेड इन इंडिया इंटरनेट ब्राउझर वीरा लॉन्च! फक्त मोबाईल फोनवर वापरता येणार, ‘ही’ आहेत वैशिष्ट https://www.navarashtra.com/india/made-in-india-internet-browser-veera-launched-only-mobile-user-can-unveiled-nrps-460792.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, मथुरेच्या बरसानामध्ये राधा राणीचा जन्मोत्सव साजरा केला जात होता. या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यावेळी गर्दीमुळे दोन भाविकांचा मृत्यू झाला. जन्मोत्सवादरम्यान गर्दीच्या जास्त दबावामुळे भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोघांचाही वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाला. सुरुवातीला एका भक्ताची शुगर लेव्हल कमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
दोन भाविकांचा मृत्यू
एसएसपी मथुरा शैलेश कुमार पांडे आणि जिल्हा दंडाधिकारी शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, मंदिर परिसरात कोणतीही घटना घडली नाही. त्यापैकी एक बरसाना येथील स्थानिक रहिवासी असून त्याचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेली दुसरी महिला भाविक मंदिराच्या आवारात होती. जिल्हा दंडाधिकारी शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, 60 वर्षीय महिलेला मधुमेहाचा त्रास होता. त्यांची साखरेची पातळी 500 च्या वर गेली होती. तेथे ७५ वर्षांचे एक वृद्ध होते, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. अफवांवर लक्ष देऊ नका. संपूर्ण यंत्रणा सुरळीत सुरू आहे.
मागच्या वर्षीही घडली होती अशीच घटना
याआधी गेल्या वर्षी जन्माष्टमीच्या दिवशी मथुरेच्या प्रसिद्ध बांके बिहारी मंदिर परिसरात प्रचंड गर्दीमुळे गुदमरून दोन भाविकांचा मृत्यू झाला होता, तर ६ जण जखमी झाले होते. मंगला आरती दरम्यान हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, प्रचंड गर्दीमुळे एक्झिट गेटवर जाम होता, तर एंट्री गेटमधूनही गर्दी सतत येत होती. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे गुदमरून अस्वस्थता पसरली आणि लोक बेशुद्ध झाले.
मात्र, काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना मंगला आरतीसाठी आणल्याचा गंभीर आरोप मंदिर प्रशासनाशी संबंधित लोकांनी केला होता. हे कुटुंबीय बाल्कनीतून दर्शन घेत होते. अधिकार्यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी वरच्या मजल्यावरचे दरवाजे बंद केले होते, त्यामुळे लोकांना वाचवण्यात अडचणी येत होत्या.
Web Title: Devotees died at barsana in mathura in radha ashtami celebration nrps