नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; राहुल-सोनियांविरुद्ध आरोपपत्र दाखल
नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस ओव्हरसीजचे प्रमुख सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि इतर काहींची नावेही समाविष्ट केली आहेत. तपास यंत्रणेकडून राऊज अव्हेन्यू कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. हा प्रकरण असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांशी संबंधित असून, याप्रकरणी पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे. काँग्रेस पक्ष सध्या कायदेशीर सल्ला घेत आहे आणि वकिलांचा सल्ला घेतल्यानंतरच अधिकृत भूमिका स्पष्ट करणार असल्याची, सूत्रांची माहिती आहे.
ईडीने आतापर्यंत AJL आणि यंग इंडियनच्या सुमारे ७५१.९ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ही मालमत्ता गुन्हेगारी उत्पन्नातून खरेदी करण्यात आली होती, असा आरोप आहे. पीएमएलए अंतर्गत ही जप्तीची कारवाई दिल्ली, मुंबई आणि लखनौ येथे करण्यात आली आहे. ईडीच्या माहितीनुसार, ६६१.६९ कोटी रुपयांची मालमत्ता AJL ची आहे. तर सुमारे ९०.२१ कोटी रुपयांची मालमत्ता यंग इंडियनशी संबंधित आहे.
ईडीने २०१४ मध्ये दिल्लीतील मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटच्या आदेशावरून AJL आणि यंग इंडियाविरोधात पीएमएलए अंतर्गत तपास सुरू केला होता. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, या प्रकरणातील आरोपींनी मेसर्स यंग इंडिया कंपनीच्या माध्यमातून AJL ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडप करण्यासाठी गुन्हेगारी कट रचला होता. AJL ला वर्तमानपत्र छपाईसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये सवलतीच्या दरात जमीन देण्यात आली होती.
AJL ने २००८ मध्ये आपले प्रकाशनकार्य बंद केले आणि मग ही मालमत्ता व्यावसायिक उद्दिष्टासाठी वापरू लागली. AJL ला अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) कडून घेतलेल्या ९०.२१ कोटी रुपयांचे कर्ज फेडायचे होते. मात्र, काँग्रेस पक्षाने हे कर्ज माफ करून AJL ची मालमत्ता केवळ ५० लाख रुपयांत मेसर्स यंग इंडियाला विकली.
यानंतर यंग इंडियाचे शेअर्स गांधी कुटुंबीय आणि त्यांच्या जवळच्या लोकांना देण्यात आले. त्यामुळे AJL ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि यंग इंडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबाचा ताबा मिळाला. याआधी AJL ने एक एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलावली होती आणि ठराव पास केला होता.
या प्रक्रियेनंतर AJL मधील १००० पेक्षा अधिक भागधारकांची हिस्सेदारी फक्त १ टक्क्यावर आली आणि AJL ही यंग इंडियाची सहाय्यक कंपनी बनली. यंग इंडियाने AJL च्या मालमत्तेवर ताबा मिळवला. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी, ऑस्कर फर्नांडिस, मोतीलाल व्होरा आणि सुमन दुबे आरोपी आहेत. ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशीही या प्रकरणात केली आहे.