Photo Credit : Social Media
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या हत्येप्रकरणी भाजपकडून सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला जात आहे. केंद्रीय मंत्री आणि बेगुसरायचे खासदार गिरिराज सिंह यांनी बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री ममतांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे गिरिराज सिंह म्हणाले, ” बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मुख्यमंत्री (ममता बॅनर्जी) आरोग्य मंत्री आहेत, कायदा आणि सुव्यवस्थाहीही त्यांच्याच हातात आहे. पण जर त्या सत्ता सांभाळू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. जर त्यांना सत्तेवरून हटवले नाही तर बंगाल आणखी एक बांगलादेश बनेल.
हेदेखील वाचा: मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी
दरम्यान, आरजी मेडिकल कॉलेजमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या महिला डॉक्टरला न्याय द्यावा, या मागणीसाठी स्वत: ममता बॅनर्जी यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता येथील मौलाली ते डोरिना स्क्वेअरपर्यंत निषेध रॅली काढत त्याचे नेतृत्त्वही केले.
हेदेखील वाचा: मुंबईचा गड राखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन
सीबीआय आता वेगवेगळ्या कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सीबीआय आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे कॉल डिटेल्स आणि चॅट माहिती गोळा करत आहे. सीबीआयने शनिवारी रात्री उशिरापर्यंत घोष यांची जवळपास 13 तास चौकशी केल्याची माहिती आहे.