देशातील अनेक राज्यांत पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू तर झारखंडमध्ये 'रेड अलर्ट' जारी (Photo : Social Media)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशभरात मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडूसह देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान 11 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या झारखंडमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
झारखंडमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे, जिथे पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूमध्ये वीज पडून एकाचा आणि उत्तराखंडमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या पलामू, गढवा आणि छत्र जिल्ह्यात आजही मुसळधार पावसासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
हिमाचल प्रदेशात राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. या पावसाळ्यात ढगफुटीच्या अनेक घटनांचा फटका राज्याला बसला आहे. त्याच वेळी, राजस्थानमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. याशिवाय, राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या अनेक भागात शनिवारी मुसळधार पाऊस पडला.
रविवारीही मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारीही मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील स्यानाचट्टी येथे ढिगाऱ्यांमुळे यमुना नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे तयार झालेल्या कृत्रिम तलावाची पाण्याची पातळी सुमारे 12 फूट कमी झाली आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरांवरून दगड पडले आणि ढिगाऱ्यांमुळे नदीचा प्रवाह अडवला गेला आणि तात्पुरता तलाव तयार झाला.
झारखंडमध्ये पाच जणांचा मृत्यू, एक बेपत्ता
झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे पाच जणांचा मृत्यू आणि एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर अनेक जण जखमी आहेत. सरायकेला-खरसावन जिल्ह्यात घर कोसळल्याने आई आणि मुलाचा मृत्यू आणि आठ जण जखमी झाले आहेत. खरसावनमध्ये भिंत कोसळल्याने एका ५ वर्षीय मुलाचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाले आहेत.