प्रयागराज महाकुंभ मेळा 2025 मध्ये किती लोकांनी गंगेमध्ये अमृत स्नान केले यावरुन राजकारण रंगले आहे (फोटो - सोशल मीडिया)
प्रयागराज : प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभमेळ्याचे फक्त देशामध्ये नाही तर जगभरातून आश्चर्य व्यक्त केले आहे. देशातील कोट्यवधी लोकांनी प्रयागराजमध्ये दाखल होऊन या अभूतपूर्व अशा सोहळ्याचा अनुभव घेतला आहे. रोज लाखो लोक गंगेमध्ये डुबकी मारत आहेत. मात्र योगी सरकार आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यामध्ये महाकुंभमेळ्यावरुन राजकारण रंगले आहे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाकुंभमेळ्यामधील व्यवस्था, हरवलेले लोक, सोयी सुविधा आणि आता एकूण स्नान केलेल्या लोकांवरुन योगी सरकारवर निशाणा साधला आहे. तर युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये एकूण किती लोकांनी अमृतस्नान केले यावरुन राजकीय वाद सुरु झाला आहे. अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन योगी सरकार जाणूनबुजून कमी आकडे दाखवत असल्याचा आरोप केला आहे.
१४ फेब्रुवारीपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, ५० कोटींहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केलेले आहे. महाकुंभाचे प्रशासन आणि व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरले, त्यामुळे राज्याची प्रतिमा खराब झाली आहे, असा आरोप अखिलेश यांनी केला. ते म्हणाले की, अराजकता आणि महागाईमुळे लाखो भाविक, वृद्ध आणि गरीब कुंभमेळ्यात स्नान करण्यापासून वंचित राहिले. यामुळे त्यांनी मेळ्याचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अखिलेश यादव यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून आगपाखड केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “आम्हाला वाटते की सुमारे 60 कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे. सरकार कमी संख्या दाखवत आहे कारण उद्या जेव्हा आंतरराष्ट्रीय माध्यमे किंवा विद्यापीठे या मेळ्याच्या प्रशासन आणि व्यवस्थापनाचा अभ्यास करतील तेव्हा त्यांना असे आढळून येईल की आलेल्या लोकांच्या संख्येनुसार योग्य प्रशासन आणि व्यवस्थापन केले गेले नाही. हे भाजप सरकारचे अपयश आहे.”
पुढे त्यांनी लिहिले की,” म्हणूनच मेळा अयशस्वी झाल्यानंतर ते जाणूनबुजून कमी संख्या दाखवत आहेत. ते स्टेजवरून मेळ्याबद्दल काहीही म्हणोत, पण त्यांच्या मनात त्यांना हे देखील माहित आहे की मेळ्याच्या अपयशामागे त्यांच्या स्वतःच्या कमतरता आणि दोष होते, ज्यामुळे देश आणि जगात उत्तर प्रदेशची प्रतिमा वाईटरित्या खराब झाली आहे.”
महाराष्ट्रसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अखिलेश यादव पुढे म्हणाले, “मेळ्यातील निकृष्ट व्यवस्थेमुळे आणि २० किलोमीटर चालत जावे लागल्यामुळे लाखो वृद्ध येथे येऊ शकले नाहीत. महागाईमुळे गरीब लोक येथे पोहोचू शकले नाहीत. आणि प्रयागराजमधील लाखो स्थानिक रहिवासी देखील वाहतूक कोंडी आणि पाहुण्यांमुळे आंघोळ करू शकले नाही,” असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
हमारा तो मानना है कि महाकुंभ में लगभग 60 करोड़ लोग स्नान कर चुके हैं। सरकार इसलिए आँकड़ा घटाकर दिखा रही है क्योंकि कल को जब इंटरनेशनल मीडिया या यूनिवर्सिटी इस मेले के Administration & Management के बारे में Study करेगा तो पाएगा कि जितने लोग आए थे, उनके हिसाब से उचित प्रशासन और…
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) February 15, 2025
या कारणांचा उल्लेख करून, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी शेवटी लिहिले की, “म्हणून आमची मागणी अशी आहे की मेळ्यातील व्यवस्था आणखी काही दिवस वाढवावी जेणेकरून वृद्ध, गरीब किंवा प्रयागराजमधील रहिवासी जे आंघोळीपासून वंचित राहिले आहेत त्यांना पुण्य मिळवण्याची संधी मिळू शकेल.”