उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक(संग्रहित फोटो)
नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय मंडळाची एक महत्त्वपूर्व बैठक आज होणार आहे. यामध्ये विविध मुद्यांवर चर्चा केल्या जाणार आहेत. त्यातच पुढील उपराष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराच्या नावावर या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ही बैठक सायंकाळी सहाच्या सुमारास भाजप मुख्यालयात होणार आहे. त्यामुळे अनेक नेते-पदाधिकाऱ्यांचे डोळे या बैठकीकडे लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या नामांकनाला उपस्थित राहण्यासाठी रालोआ शासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही दिल्लीत बोलावले आहे. रालोआचे उमेदवार २१ ऑगस्ट रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
रालोआची मजबूत स्थिती
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठीच्या मतदारसंघात लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा समावेश आहे. सध्या संसदेच्या एकूण ७८० जागांपैकी भाजपकडे ३९४ खासदार आहेत, जे बहुमताच्या ३९० पेक्षा जास्त आहेत. या मजबूत स्थितीमुळे, एनडीए उमेदवाराला उपराष्ट्रपतिपदावर विजयासाठी एक मजबूत दावेदार मानले जाते.
उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया
निवडणूक आयोगाने ७ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ साठी अधिसूचना जारी केली होती, ज्यामध्ये नामांकन आणि मतदानाच्या तारखा नमूद केल्या होत्या. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे, तर नामांकन पत्रांची छाननी २२ ऑगस्ट रोजी होईल. उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट आहे आणि मतदान ९ सप्टेंबर रोजी होईल.
संभाव्य उमेदवारांची नावे
अद्याप कोणतेही अधिकृत नाव समोर आले नसले तरी काही संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह आणि केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर यांचा समावेश आहे. याशिवाय दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची नावेही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत.
विरोधकांकडून तयारीही सुरु
विरोधी आघाडी, इंडिया देखील उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवार उभा करण्याची तयारी करत आहे. तथापि, त्यांचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विरोधी पक्षांमध्ये या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे आणि येत्या काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.