नवी दिल्ली : चीनच्या अनेक ॲप्सवर (Chinese Apps) यापूर्वी भारत सरकारने कारवाई करून बंद केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत सरकारने याच चीनी ॲप्सवर मोठी कारवाई केली आहे. सरकारने बंदी (Chinese Apps Ban in India) घातलेल्या ॲप्समध्ये 138 बेटिंग अॅप्स आणि 94 लोन अॅप्स आहेत. या अॅप्समुळे भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका असल्याने भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तात्काळ आणि आणीबाणीच्या आधारावर या चीनी लिंक्ड अॅप्सवर बंदी घालण्याची आणि ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अहवालानुसार, गृह मंत्रालयाने सहा महिन्यांपूर्वी 288 चिनी कर्ज अॅप्सवर देखरेख सुरू केली होती. यापैकी 94 ॲप्स स्टोअरवर उपलब्ध आहेत आणि इतर थर्ड पार्टी लिंकद्वारे काम करत आहेत. गृह मंत्रालयाने या आठवड्यात हे अॅप्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे अॅप्स ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
उत्तर प्रदेश, तेलंगणा, ओडिशासह इतर राज्यांकडून शिफारस
उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा यांसारख्या राज्यांनी तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थांनी या अॅप्सवर कारवाई करण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. त्यानुसार, आता या ऍप्सवर कारवाई करण्यात आली. तसेच लिंक्सवर तात्काळ आणि आणीबाणीच्या आधारावर बंदी आणि ब्लॉक करण्यात आले आहे.