दिल्ली : संपूर्ण देशासह अनेक देशांचे लक्ष हे भारताच्या निवडणुकीकडे लागले आहे. उद्या (दि.01) देशातील अंतिम सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक आणि प्रचार जोरदार झाला आहे. एनडीए आघाडीविरुद्ध देशातील सर्वच विरोधकांनी मोट बांधत लढा दिलामात्र इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. 48 तासांमध्ये इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा समोर येणार असल्याचा दावा कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी वक्तव्य केले आहे.
देशातील विरोधकांनी एनडीए आघाडीला शह देण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करत निवडणूक लढवली. एनडीए आघाडीकडून नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर असला तरी इंडिया आघाडीकडून कोण उमेदवार असेल याबाबत स्पष्टता नव्हती. इंडिया आघाडीच्या निवडणूकीपूर्वी झालेल्या अनेक बैठकांमध्ये देखील पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवण्यात आला नव्हता. मात्र येत्या 48 तासांमध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार समोर येणार असल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला आहे.
जयराम रमेश यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधला. जयराम रमेश म्हणाले, विरोधकांच्या आघाडीमध्ये जो पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवेल, त्याच पक्षाचा उमेदवार तोच पुढच्या काळात आघाडी करण्याचा उमेदवार असेल आणि सरकारसाठी दावेदार असेल. ‘इंडिया’ आघाडीचा विजय झाल्यास पंतप्रधानांची निवड आणि नेतृत्व यावर रमेश म्हणाले, “2004 मध्ये निवडणुकीचे निकाल 13 मे रोजी आले आणि संयुक्त पुरोगामी आघाडीची स्थापना 16 मेला झाली. मनमोहन सिंग यांचे नाव 17 मे रोजी समोर आले होते. यावेळी मला वाटत नाही की 48 तासही लागतील (पंतप्रधान निवडीचा निर्णय घेण्यासाठी). असे स्पष्ट मत जयराम रमेश यांनी व्यक्त केले.
निवडणुकीत हिंदू-मुस्लिम अजेंडा चालला नाही
ते म्हणाले, “या जनबंधनात ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील तोच पक्ष नेतृत्वाचा स्वाभाविक दावेदार असेल, हे स्पष्ट आहे. या निवडणुकीत भाजपचा हिंदू-मुस्लिम अजेंडा कामाला आला नाही. शेतकरी, कामगार, तरुण आणि मागासवर्गीय असे सगळेच मोदींना पराभूत करण्यात गुंतले आहेत, असे वाटले होते. या निवडणुकीत भाजपच्या बाजूने कोणतीही लाट आलेली नाही. फक्त ‘बाहेर जाणाऱ्या पंतप्रधानांचे विष’ आहे. 20 वर्षांनंतर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि विरोधी आघाडीला ‘स्पष्ट आणि निर्णायक’ जनादेश मिळेल, असा विश्वास जयराम रमेश यांनी व्यक्त केला.